रावेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील पाल येथील परमपूज्य संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी आश्रम श्री वृंदावन धामात ९ ते १० जुलै दरम्यान दोन दिवसीय भव्य गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाला देशभरातून लाखो चैतन्य साधक भाविक उपस्थित राहणार असल्याने, त्यांच्या सोयीसाठी आणि व्यवस्थेसाठी रावेर तहसील कार्यालयात तहसीलदार बंडू कापसे यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय पदाधिकाऱ्यांची नियोजन बैठक घेण्यात आली.
विविध विभागांकडून सोयीसुविधांचे नियोजन
या बैठकीत भाविकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी विविध विभागांकडून केल्या जाणाऱ्या सोयीसुविधांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

महावितरण: सुरळीत वीजपुरवठ्यासाठी अतिरिक्त कर्मचारी आणि देखभालीची व्यवस्था.
पाल ग्रामपंचायत: गावाच्या स्वच्छतेसाठी नियोजन, पिण्याच्या पाण्याची सोय, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह पार्किंगची व्यवस्था, कचराकुंड्या आणि मोबाईल शौचालये.
प्राथमिक आरोग्य केंद्र: भाविकांसाठी मेडिकल कॅम्प, आवश्यक औषधे आणि पुरेसा डॉक्टर व कर्मचारी वर्ग.
आगार महामंडळ: रावेर व सावदा येथून भाविकांसाठी जादा बस सेवा.
वनविभाग: रेस्ट हाऊस बुकिंग करून भाविकांची व्यवस्था, तसेच पायी दिंडीत येणाऱ्या भक्तांसाठी बोरघाटात पोलीस प्रशासन व वनविभागामार्फत विशेष सुरक्षा.
पोलीस प्रशासन: बॅरिकेड्सची व्यवस्था, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुरेसे पोलीस संरक्षण.
बांधकाम विभाग: रावेर ते पालपर्यंतच्या रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती.
आश्रम आणि अधिकाऱ्यांकडून सूचना
पाल आश्रमातर्फे दिव्य चैतन्यजी महाराज यांनी गेल्या वर्षी पार्किंगमधून गाडी चोरीला गेल्याने यावर्षी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह सुरक्षित पार्किंग, सुरळीत वीजपुरवठा, टँकरद्वारे पाण्याची व्यवस्था आणि गावाच्या प्रवेशद्वाराजवळ योग्य नियोजन करण्यावर भर दिला. श्याम चैतन्यजी महाराज यांनी गुरु दरबारात श्रद्धेने येणाऱ्या भाविकांसोबत काही ‘हौसे-गौसे-नवसे’ मंडळीही येतात, त्यामुळे सावधगिरी बाळगणे आवश्यक असल्याचे सांगितले. आपल्याकडून भाविकांना उत्कृष्ट सेवा मिळावी आणि गुरुपौर्णिमा महोत्सव सुव्यवस्थित पार पडावा यासाठी मेहनत घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
या बैठकीला पोलीस निरीक्षक विशाल जायसवाल, गट विकास अधिकारी, आगार प्रमुख इम्रान पठाण, टीएमओ ऑफिसर आर. व्ही. खैरनार, सीएमआरएफ डॉ. पुष्कर महाजन, डॉ. अजित विसपुते, डॉ. मनोज विसपुते, डॉ. सतीश पाटील, डॉ. तुषार पाटील, महावितरणचे एम. पी. ठाकरे, पाल ग्रामसेवक सवर्णे, आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील कळसकर, वनपरिक्षेत्र अधिकारी अजय बावणे, सा. बां. उपविभाग हेमंत महाजन, मंडळ अधिकारी एन. जे. धांडे, तलाठी एस. एम. तडवी, हवालदार विठ्ठल देशमुख, हिरालाल उमाळकर, चैतन्य नारखेडे आदी अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार दीपक नगरे यांनी मानले.



