Home Cities यावल यावल येथे भीम आर्मीचे सार्वजनिक बांधकाम विभागात अनोखा निषेध आंदोलन !

यावल येथे भीम आर्मीचे सार्वजनिक बांधकाम विभागात अनोखा निषेध आंदोलन !


यावल लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल येथील उपविभागीय सार्वजनिक बांधकाम विभागात अधिकारी वेळेवर उपस्थित राहत नसल्याने भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार वागणुकीचा निषेध करण्यासाठी भीम आर्मी भारत एकता मिशनचे जळगाव जिल्हाध्यक्ष गणेश सपकाळे यांनी एक अनोखे आंदोलन केले. त्यांनी रिकाम्या खुर्चीला हार घालून अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीचा उपरोधिक निषेध नोंदवला.

गेल्या अनेक दिवसांपासून भीम आर्मीचे कार्यकर्ते यावलच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी कार्यालयात जात होते. मात्र, अधिकारी अनेकदा कार्यालयात उपस्थित राहत नव्हते, ज्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. “अधिकारी वेळेवर येत नाहीत, पण त्यांची खुर्ची तरी नेहमी जागेवर असते. म्हणून तीच ‘प्रामाणिक’ असल्यामुळे तिचाच सत्कार करायचा ठरवलं,” अशी उपरोधिक प्रतिक्रिया सपकाळे यांनी दिली.

यावेळी त्यांनी यावलच्या सार्वजनिक बांधकाम विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत, या सर्व प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधित उपविभागीय अधिकाऱ्याला निलंबित करण्याची मागणी केली. या आंदोलनात जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राहुल जयकर, आकाश बिऱ्हाडे, सागर मेघे, विक्की तायडे, विशाल वाघमारे यांचा समावेश होता.

सध्या हा ‘खुर्ची सत्कार’ प्रकार परिसरात चर्चेचा विषय ठरला असून, सोशल मीडियावर याचे फोटो व व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. अनेकांनी यावर “हा स्वागत होता की टीका?” असा सवाल उपस्थित करत या अनोख्या निषेध पद्धतीचे कौतुक केले आहे.


Protected Content

Play sound