Home Cities जळगाव प्रत्येक गावात ‘बालिका पंचायत’ स्थापन करा; सीईओ मिनल करनवाल यांचे आवाहन

प्रत्येक गावात ‘बालिका पंचायत’ स्थापन करा; सीईओ मिनल करनवाल यांचे आवाहन


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । “कोणताही देश तेव्हाच विकसित होतो, जेव्हा त्या देशाचे भविष्य शिक्षित होऊन सक्षम होते.” असे प्रतिपादन करत, जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी जिल्ह्यातील प्रत्येक गावात ‘बालिका पंचायत’ हा उपक्रम राबवून मुलींना सक्षम करण्याचे आवाहन केले. बालिका स्नेही पंचायत जिल्हास्तरीय सरपंच कार्यशाळेत मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. जिल्हा परिषदेच्या शाहू महाराज सभागृहात महिला व बाल विकास विभागामार्फत या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी हेमंत भदाणे उपस्थित होते.

श्रीमती मिनल करनवाल यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात बालिका पंचायत या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमाची माहिती देण्यासाठी जिल्ह्यातील सरपंचांसाठी ही कार्यशाळा आयोजित केली होती.

या उपक्रमाची सविस्तर माहिती देताना सीईओ करनवाल यांनी सांगितले की, यात ११ ते २१ वयोगटातील मुली सहभागी होऊ शकतात. प्रत्येक ग्रामपंचायतीत ५ मुलींची ‘बालिका पंचायत’ स्थापन केली जाईल, ज्यात एक सरपंच आणि एक सचिव निवडण्यात येईल. या पंचायतीच्या माध्यमातून बालविवाह, हुंडा प्रथा, मद्यपान यांसारख्या सामाजिक समस्यांवर जनजागृती करणे, मुलींना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यपद्धतीची ओळख करून देणे, तसेच स्वच्छता, आरोग्य, शिक्षण यांसारख्या विषयांवर काम करणे हे मुख्य उद्देश आहेत.

विशेष म्हणजे, या उपक्रमातून मुलींना ग्रामपंचायतींसाठी ठराव सुचवण्याची संधी देण्यात आली आहे. या ठरावांवर आधारित ग्रामपंचायतींनी कृती केल्यास, संबंधित बालिका पंचायतींना पुरस्कार देण्यात येणार आहेत. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना जिल्हा परिषदेच्या वतीने ‘सर्वोत्तम बालिका पंचायत’ म्हणून गौरविण्यात येणार आहे. हा उपक्रम मुलींमध्ये नेतृत्वगुण, सामाजिक भान आणि लोकशाही प्रक्रियेची ओळख निर्माण करून त्यांना भविष्यात सक्षम नागरिक आणि नेते बनण्यास मदत करेल, असेही श्रीमती करनवाल यांनी नमूद केले.

यावेळी श्रीमती करनवाल यांनी उपस्थित सरपंचांशी थेट संवाद साधला आणि त्यांच्या ग्रामपंचायतींमध्ये मुलींच्या संदर्भात राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती घेतली. ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेतील लाभार्थींना त्यांच्या हस्ते ठेव पावतीचे वितरणही करण्यात आले. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील मोठ्या संख्येने सरपंच उपस्थित होते.


Protected Content

Play sound