Home आरोग्य खामगावात व्हेरिकोज व्हेन्स आणि थायरॉईड नोड्यूल तपासणी शिबिर!

खामगावात व्हेरिकोज व्हेन्स आणि थायरॉईड नोड्यूल तपासणी शिबिर!


खामगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रोटरी क्लब खामगाव आणि सिल्व्हरसिटी मल्टीस्पेशॅलिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने व्हेरिकोज व्हेन्स आणि थायरॉईड नोड्यूल तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर येत्या रविवारी २७ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी १ या कालावधीत होणार आहे.

व्हेरिकोज व्हेन्स म्हणजे पायांमधील अशुद्ध रक्तवाहिन्या फुगणे. यामुळे पायांवर नसा ठळक दिसतात, वेदना होतात, सूज येते आणि काहीवेळा अल्सरही होऊ शकतो. तर, थायरॉईड नोड्यूल म्हणजे थायरॉईड ग्रंथीवरील असामान्य वाढ होय, जे नेहमी कर्करोगाचे नसतात, पण काहीवेळा धोकादायक ठरू शकतात.

अनेकदा या समस्यांवर उपचारासाठी मोठ्या शहरांवर अवलंबून राहावे लागते, ज्यामुळे रुग्णांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन रोटरी क्लबने सिल्व्हरसिटी हॉस्पिटलच्या सहकार्याने हे शिबिर आयोजित केले आहे.

या शिबिरात नागपूर आणि वर्धा येथील सुप्रसिद्ध तज्ञ डॉक्टर – डॉ. पंकज बानोडे, डॉ. सात्विक धिरवाणी, डॉ. शुभम दुगड आणि डॉ. शुभम बोधनकर रुग्णांची तपासणी करतील आणि त्यांना योग्य उपचार व मार्गदर्शन देतील.

या तपासणी शिबिरासाठी नोंदणी शुल्क केवळ ५० रुपये आहे आणि जागेवरच नोंदणीची सोय उपलब्ध असेल. तरी, ज्या व्यक्तींना व्हेरिकोज व्हेन्स किंवा थायरॉईड नोड्यूलचा त्रास आहे, त्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन रोटरी क्लबचे अध्यक्ष विजय पटेल, मानद सचिव किशन मोहता, प्रकल्प प्रमुख नितीन शाह, सह प्रकल्प प्रमुख सुरेश पारीक आणि सहसचिव (प्रकल्प) विनीत लोडाया यांनी केले आहे.


Protected Content

Play sound