Home क्राईम गोळीबार प्रकरणात चौघांपैकी दोन जणांना अटक; मुख्य संशयित फरार !

गोळीबार प्रकरणात चौघांपैकी दोन जणांना अटक; मुख्य संशयित फरार !

0
162


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील सेंट जोसेफ शाळेच्या मेन गेट समोर एका वाढदिवसाच्या पार्टीत गुरुवारी २४ एप्रिल रात्री ९ ते ९.३० वाजेच्या दरम्यान गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. पूर्ववैमनस्यातून काही तरुणांनी मिळून महेंद्र समाधान सपकाळे (वय २०, रा. प्रबुद्ध नगर, पिंप्राळा) याच्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात महेंद्रच्या कमरेखाली गोळी लागल्याने त्याला तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन जणांना अटक करण्यात आली तर मुख्य आरोपी हा फरार आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, महेंद्र सपकाळे याचा मित्र भुषण मनोज अहिरे याचा वाढदिवस असल्याने तो त्याचे मित्र अक्षय नारायण राठोड (उर्फ गण्या) आणि सचिन चौधरी यांच्यासोबत गुरूवारी २४ एप्रिल रोजी रात्री ९ ते ९.३० वाजेच्या सुमारास सेंट जोसेफ शाळेच्या गेटसमोर केक कापण्यासाठी गेला होता. त्यावेळी विशाल भिकन कोळी, बाबु बन्शीलाल धोबी (दोन्ही रा.पिंप्राळा) आणि वैभव धिरज कोळी ( रा. धरणगाव) आणि भोला भोई रा. पिंप्राळा हे ४ ते ५ इतर साथीदारांसह तिथे आले आणि महेंद्रला शिवीगाळ करण्यास सुरूवात केली.

यावेळी विशाल कोळी याने महेंद्रला धमकावत म्हटले की, “राम नवमीच्या दिवशी तू माझ्या वडिलांना मारले आहेस, त्यामुळे मी तुला जिवंत सोडणार नाही.” त्यानंतर क्षणाचाही विलंब न करता विशालने त्याच्या कमरेला लपवलेली बंदूक काढली आणि महेंद्रच्या उजव्या बाजूला पाठीमागून (ढुंगणावर) गोळी झाडली. इतकेच नव्हे, तर बापु धोबी, वैभव कोळी आणि भोला भोई या तिघांनीही महेंद्रला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली.

दरम्यान, विशाल कोळी आणखी एक गोळी झाडण्याच्या तयारीत असताना, महेंद्रचे मित्र सचिन चौधरी आणि भुषण अहिरे यांनी प्रसंगावधान राखत विशालला जोरदार धक्का दिला. या झटापटीत सचिन चौधरीला किरकोळ दुखापत झाली. गोळीबाराचा आवाज ऐकून घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली, त्यामुळे विशाल कोळी आणि त्याचे साथीदार तेथून पळून गेले. गोळी लागल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या महेंद्रने त्वरित त्याचा मित्र मनोज रमेश भालेराव याला फोन करून मदतीसाठी बोलावले. मनोज तातडीने घटनास्थळी पोहोचला आणि त्याने महेंद्रला आपल्या दुचाकीवरून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. दरम्यान या घटनेबाबत महेंद्र सपकाळे याने दिलेल्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात विशाल भिकन कोळी, बाबु बन्शीलाल धोबी (दोन्ही रा.पिंप्राळा) आणि वैभव धिरज कोळी ( रा. धरणगाव) आणि भोला भोई रा. पिंप्राळा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीसांनी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. तर मुख्य आरोपी विशाल कोळी आणि एक साथीदार हे अद्याप फरार आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोरूडे हे करीत आहे.


Protected Content

Play sound