Home Cities जळगाव आता प्रत्येक अंगणवाडीत ‘बालसंगोपन रजिस्टर’!, सीईओ मिनल करनवाल यांचे निर्देश

आता प्रत्येक अंगणवाडीत ‘बालसंगोपन रजिस्टर’!, सीईओ मिनल करनवाल यांचे निर्देश

0
175


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्ह्यातील बालकांचे आरोग्य उत्तम राहावे आणि बालवयातच त्यांच्या प्रकृतीशी संबंधित सूक्ष्म लक्षणांची नोंद नियमितपणे व्हावी, यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे जिल्ह्यातील प्रत्येक अंगणवाडीत ‘बालसंगोपन रजिस्टर’ ठेवण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी दिले आहेत. या रजिस्टरमध्ये बालकांच्या आरोग्याशी संबंधित लहान-मोठ्या लक्षणांची नोंद अंगणवाडी सेविका करणार आहेत, ज्यामुळे बालकांना वेळीच उपचार मिळण्यास मदत होईल आणि ते निरोगी राहतील.

जळगाव जिल्ह्यात एकूण ३ हजार ४३६ अंगणवाड्या कार्यरत आहेत. या अंगणवाड्यांमध्ये बालकांच्या आरोग्याशी संबंधित विविध नोंदी अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर यांच्या माध्यमातून घेतल्या जातात. या नोंदी ग्रामीण भागातील बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतात. तसेच, बालकांमध्ये गंभीर आजारांची लक्षणे आढळल्यास त्वरित उपचार करणे शक्य होते. मात्र, अनेकदा बालकांमध्ये दिसणाऱ्या छोट्या लक्षणांकडे दुर्लक्ष केले जाते आणि याच लहान लक्षणांचे रूपांतर भविष्यात गंभीर आजारांमध्ये होण्याची शक्यता असते.

या गंभीर बाबी लक्षात घेऊन, बालकांमधील आरोग्याशी संबंधित विविध लक्षणांचे वेळीच निदान व्हावे आणि त्यांच्या आरोग्यासंदर्भात भविष्यात उद्भवणाऱ्या समस्यांना प्रतिबंध घालता यावा, यासाठी आता प्रत्येक अंगणवाडीत ‘बालसंगोपन रजिस्टर’ ठेवले जाणार आहे. या रजिस्टरमुळे बालकांच्या प्रकृतीची सविस्तर माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे.

याव्यतिरिक्त, राष्ट्रीय आरोग्य बाल स्वास्थ्य मिशन कार्यक्रमांतर्गत प्रत्येक बालकाचा गूगल फॉर्म भरण्यात येणार आहे. या डिजिटल प्रणालीमुळे प्रत्येक बालकाच्या प्रकृतीची अद्ययावत माहिती मिळवणे शक्य होणार आहे. जळगाव जिल्ह्यात ग्रामीण आणि डोंगरी भागांमध्ये लहान बालकांमध्ये कुपोषणाची समस्या मोठी आहे. ‘बालसंगोपन रजिस्टर’ आणि गूगल फॉर्मच्या माध्यमातून लहान वयापासूनच बालकांच्या प्रकृतीसंबंधी सर्व माहिती संकलित केली जाईल, ज्यामुळे कुपोषणाची लक्षणे दिसणाऱ्या बालकांवर तातडीने उपचार करणे अधिक सोपे जाईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.


Protected Content

Play sound