Home Cities मुक्ताईनगर मिलिंद लोणारी यांची ग्रामविकास गुणवंत कर्मचारी म्हणून निवड

मिलिंद लोणारी यांची ग्रामविकास गुणवंत कर्मचारी म्हणून निवड


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या वतीने सन २०२२-२३ या वर्षासाठी जाहीर करण्यात आलेल्या गुणवंत अधिकारी/कर्मचारी पुरस्कारात पंचायत समिती, धरणगाव येथील आरोग्य सेवक मिलिंद मनोहर लोणारी यांची गौरवपूर्ण निवड करण्यात आली आहे. त्यांच्या कार्यक्षमता, तांत्रिक कौशल्य आणि सामाजिक योगदानाची दखल घेत शासनाने हे सन्मानचिन्ह जाहीर केले आहे. राज्य शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करताना अधिकारी-कर्मचाऱ्यांचे कौशल्य महत्त्वाचे ठरते. त्यांच्या कार्याची दखल घेऊन शासन निर्णय दिनांक २ सप्टेंबर २००५ नुसार सुरू करण्यात आलेल्या या पुरस्कार योजनेचा हा भाग आहे.

यापूर्वीही लोणारी यांना राज्यस्तरीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार मिळाला असून, तो २३ जानेवारी २०२३ रोजी मुंबईच्या रंगशारदा सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला होता. यामध्ये त्यांना स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि एक लाख रुपये रोख रक्कम देण्यात आली होती. कार्यक्रमाला राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मा. ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री मा. ना. देवेंद्र फडणवीस आणि आरोग्यमंत्री मा. ना. दीपक सावंत उपस्थित होते.

श्री. लोणारी यांनी जिल्हा परिषद जळगाव येथील सेवाकाळात आरोग्य विभागाच्या जिल्हा प्रसिद्धी व माध्यम अधिकारी पदाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली. त्यांनी कोविड संकटाच्या काळात साथरोग नियंत्रणासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्याबद्दल त्यांचा राज्य आरोग्य, शिक्षण व संपर्क विभाग, पुणे यांच्या वतीने सहाय्यक संचालक यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला होता. राज्य शासनाच्या वतीने तिसऱ्यांदा मिळालेला हा गुणवंत कर्मचारी पुरस्कार म्हणजे त्यांच्या सातत्यपूर्ण उत्कृष्ठ सेवाभावाची पावती आहे. त्यांच्या या सन्मानाबद्दल सर्वत्र कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


Protected Content

Play sound