मोठी बातमी ! एमपीएससीची परीक्षा एक महिना पुढे ढकलली

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा |  महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) आयोजित करण्यात आलेली राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२४ आता एक महिना पुढे ढकलण्यात आली आहे. पूर्वी ही परीक्षा २६ ते २८ एप्रिल २०२५ दरम्यान नियोजित होती, मात्र आता ती २७, २८ व २९ मे २०२५ या कालावधीत होणार असल्याचे आयोगाने प्रसिद्ध केलेल्या शुद्धिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयामुळे परीक्षेच्या तयारीत गुंतलेल्या उमेदवारांना एक महिन्याचा अतिरिक्त वेळ मिळणार असून, विशेषतः नव्याने पात्र ठरलेल्या ३१८ उमेदवारांना मोठा दिलासा मिळणार आहे.

राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२४ चा निकाल १२ मार्च २०२५ रोजी जाहीर करण्यात आला होता. मात्र काही उमेदवारांनी ईडब्ल्यूएस अथवा ओपन मधून एसईबीसी किंवा ओबीसी या प्रवर्गात वर्गवारी बदल केल्यानंतर, त्यांच्या अर्जामध्ये तो बदल दिसून आला नाही. परिणामी, अनेक उमेदवारांनी आयोगाकडे निवेदने सादर केली. आयोगाने या निवेदनांचा विचार करून, एनसीएल प्रमाणपत्राच्या अटींच्या अधीन राहून, एसईबीसी/ओबीसी प्रवर्गातील दावा ग्राह्य धरण्याचा निर्णय घेतला. यानुसार, सुधारित निकाल २९ मार्च २०२५ रोजी जाहीर करण्यात आला आणि ३१८ नव्या उमेदवारांना मुख्य परीक्षेस पात्रता मिळाली.

नव्याने पात्र ठरलेल्या उमेदवारांनी मुख्य परीक्षेसाठी वेळ कमी असल्याची व्यथा मांडली होती. याची दखल घेत आयोगाने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. आयोगाने स्पष्ट केले की, आरक्षणाच्या अनुषंगाने उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीमुळे हा बदल करण्यात आला असून, ही एकवेळची अपवादात्मक बाब आहे. सदर परीक्षेसाठी दिनांक १८ मार्च २०२५ रोजी प्रसिद्ध अधिसूचना आणि नंतरच्या शुद्धिपत्रकांतील इतर अटी व शर्ती यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, अशी माहितीही आयोगाने स्पष्ट केली आहे. या बदलामुळे उमेदवारांना अभ्यासासाठी अधिक वेळ मिळणार असून, योग्य नियोजन करून अधिक चांगली तयारी करता येईल. आयोगाच्या या निर्णयाचे अनेकांकडून स्वागत होत आहे.

Protected Content