नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | उद्धव ठाकरे यांनी बुधवारी नाशिक येथे आयोजित निर्धार शिबिरात केंद्रातील मोदी-शहा जोडीवर तीव्र शब्दांत हल्ला चढवला. “उन्हाळा तापला आहे, पण आपली डोकी उन्ह्याने नव्हे तर अन्यायाविरोधात पेटली पाहिजेत,” असे म्हणत त्यांनी सर्वसामान्य शिवसैनिकांना रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले. उद्धव ठाकरेंनी राज्यपाल भवनाच्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याची जोरदार मागणी केली. यासाठी त्यांनी भाजप खासदार उदयनराजे भोसले यांच्या मागणीचे समर्थन करत स्पष्ट केले की, “शिवरायांपेक्षा राज्यपाल मोठे असू शकत नाहीत.”


“सत्ता असली की अनेक जण मागे उभे राहतात, पण सत्ता नसतानाही जे सोबत राहतात, तेच खरे निष्ठावान,” असे सांगत उद्धव ठाकरे यांनी आपल्या शिवसैनिकांची स्तुती केली. “तुम्ही वाघाचे छावे आहात,” असा उल्लेख करत त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला. ठाकरेंनी महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकीय तापमानावर भाष्य करताना, “महाराष्ट्र तापलाय, पण आमची लढण्याची जिद्द अधिक तापली पाहिजे,” असे सांगितले. “डोकी उन्ह्याने नव्हे तर विचारांनी गरम होणे गरजेचे आहे,” असा सल्लाही त्यांनी दिला.
“मुंबईतील प्रकल्प, कार्यालयं गुजरातला हलवली जात आहेत. माझा सर्व गुजरात्यांवर राग नाही, पण जे दोन जण तिकडे बसले आहेत त्यांना महाराष्ट्र म्हणजे काय हेच माहीत नाही,” असे म्हणत उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे नरेंद्र मोदी आणि अमित शहांवर निशाणा साधला.अमित शाह यांनी रायगडावर ‘शिवरायांना महाराष्ट्रापुरते मर्यादित ठेऊ नका’ असे वक्तव्य केल्यावर ठाकरेंनी उत्तर दिले – “महाराज त्या काळातही जागतिक स्तरावर पोहोचले होते. त्यांच्या लढ्याची दखल लंडनच्या गॅझेटमध्येही घेतली गेली होती. त्यामुळे हे सांगणारे तुम्ही कोण?”
उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्या “शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना टकमक टोकावरून ढकलावेसे वाटते” या वक्तव्यावरही निशाणा साधला. “फडणवीस बोलत होते, पण कुणीतरी सांगितले की शिवरायांविषयी एकेरी उल्लेख करणारे स्वतः अमित शाह आहेत. त्यामुळे ते बोलणे थांबवले,” असे त्यांनी सांगितले. ठाकरेंनी भाजपवर दुटप्पी हिंदुत्वाचा आरोप केला. “बिहारमध्ये ‘सौगात ए मोदी’ योजनेतून ३२ लाख मुस्लिमांना भेटवस्तू दिल्या जातात आणि इकडे आम्हाला हिंदुत्व शिकवले जाते. महाराष्ट्रात ‘बटेंगे तो कटेंगे’ आणि बिहारमध्ये ‘बाटेंगे तो जितेंगे’ – हा भाजपचा खरा चेहरा आहे,” अशी घणाघाती टीका त्यांनी केली.
“वक्फ बोर्ड विधेयक हिंदू धर्माशी संबंधित नाही म्हणून आम्ही विरोध केला. पण दोनच दिवसात अमित शहा तामिळनाडूत जाऊन अण्णाद्रमुकसोबत हातमिळवणी करतात. यांचे हिंदुत्व म्हणजे गरजेनुसार वळण घेणारे आहे,” अशी टीकाही ठाकरे यांनी केली. “आज नाशिक जिल्हा पालकमंत्र्यांविना बेवारस पडलेला आहे. येथे काय दिवे लावलेत?” असा सवाल करत ठाकरेंनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला.
“महिलांना २१०० रुपये देण्याचे आश्वासन निवडणुकीपूर्वी दिले, पण आता ५०० रुपयेच मिळतील असे सांगत आहेत. ही सरळसरळ फसवणूक आहे,” असा आरोप करत त्यांनी भाजप सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या निर्धार शिबिरातून उद्धव ठाकरेंनी एकप्रकारे शिवसेना (ठाकरे गट) नव्याने सज्ज असल्याचे संकेत दिले. त्यांच्या भाषणातून सरकारवर रोखठोक टीका होतीच, पण त्यामागे महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि स्वाभिमानाचा सूरही स्पष्टपणे दिसून आला.


