अहमदाबाद-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । अहमदाबादमध्ये झालेल्या काँग्रेसच्या ८४ व्या अधिवेशनात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्रातील मोदी सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी बोलताना त्यांनी संसद, लोकशाही, निवडणूक प्रक्रिया आणि राष्ट्रीय मालमत्ता विक्रीबाबत केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले.


खरगे म्हणाले, “संसदेच्या नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारने मनमानी केली. विरोधकांना बोलण्याची संधी नाकारण्यात आली. लोकसभा विरोधी पक्षनेते **राहुल गांधींना बोलू दिले गेले नाही, ही लोकशाहीची विटंबना आहे,” असा आरोप त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले, “संसद पहाटे ५ वाजेपर्यंत चालू ठेवली जाते, मात्र महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होत नाही. अमेरिका भारतावर २६% कर लावतो, तरीही यावर संसदेत बोलले जात नाही. ११ वर्षे पंतप्रधान आणि १३ वर्षे मुख्यमंत्री राहूनही मोदींनी गरिबी कमी केली का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
सरकारी मालमत्तेच्या विक्रीवरूनही त्यांनी सरकारवर निशाणा साधला. “एअरपोर्ट, खाण, टेलिकॉम, मीडिया हाऊस अशा महत्वाच्या क्षेत्रातील मालमत्ता उद्योगपती मित्रांना दिल्या जात आहेत. हे राष्ट्रीय सुरक्षेसाठीही धोका आहे. जर हीच परिस्थिती राहिली, तर एक दिवस मोदी सरकार देश विकून निघून जाईल,” असा इशारा खरगे यांनी दिला.
मतदार यादीतील चुकांवरूनही त्यांनी चिंता व्यक्त केली. “महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या झाली. भाजप १५० जागा लढवून १३८ जिंकतो – हे सामान्य गोष्ट नाही. आमचे वकील आणि नेते मतदार यादीतील घोळ उघड करत आहेत. चोर कधी ना कधी पकडला जातोच,” असंही त्यांनी ठामपणे सांगितलं.
परदेशात गेलेल्या तरुणांचे उदाहरण देत त्यांनी पंतप्रधानांच्या मौनावर सवाल केला. “आज १५ लाख तरुण परदेशात स्थायिक झाले आहेत. काहींना अमेरिकेतून साखळदंडांनी बांधून परत पाठवलं जातं, पण पंतप्रधान यावर मौन बाळगतात.” ईव्हीएम आणि निवडणूक प्रक्रियेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. “जगातील अनेक देश ईव्हीएम सोडून पुन्हा मतपत्रिकांवर जात आहेत. पण भारतात मात्र सत्ताधारी पक्षाचं तंत्रज्ञान फक्त त्यांनाच फायदा देतं आहे. उद्या देशातील तरुण उठून सांगतील – ‘हमें बैलेट चाहिए, ईव्हीएम नहीं’,” असे खरगे यांनी ठासून सांगितले.
खरगे यांनी काँग्रेसच्या कालखंडात झालेल्या विकासाचेही उदाहरण दिले. “गांधीनगर हे चंदीगडनंतर भारतातील सर्वात आधुनिक शहर आहे आणि ते काँग्रेसच्या कार्यकाळात उभारले गेले. देशाचा विकास फक्त २०१४ नंतरच झाला, हा सत्ताधाऱ्यांचा भ्रम आहे,” असा टोला त्यांनी लगावला.
या भाषणातून खरगे यांनी केंद्र सरकारच्या कारभारावर सर्वंकष टीका करत लोकशाही, स्वातंत्र्य आणि विकासाचे खरे मूल्य काँग्रेसच जपते, हा संदेश देण्याचा प्रयत्न केला.


