बोंबला…होणाऱ्या जावयासोबतच सासूचे पलायन !

अलीगड-वृत्तसेवा | आपल्या होणाऱ्या जावयासोबतच एका महिलेने पळ काढला असून ती घरातील रोकड व दागिने घेऊन बेपत्ता झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

उत्तर प्रदेशातील अलीगढ जिल्ह्यात एका महिलेनं स्वतःच्या होणाऱ्या जावयासोबत घरातून सोनं, चांदी आणि रोख रक्कम घेऊन फरार होण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, हा तरुण तिच्या मुलीशी लग्न करणार होता आणि हे लग्न येत्या १६ एप्रिल रोजी होणार होतं.

मुलीच्या लग्नाच्या काही दिवस आधीच आईने घरातील जवळपास ५ लाखांचे दागिने आणि ३.५ लाख रुपये रोख घेऊन पळ काढला. या घटनेनंतर कुटुंबात एकच खळबळ उडाली असून मुलीची तब्येत खालावल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

महिलेच्या पती जितेंद्र यांनी पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजवायला सुरुवात केली असून पत्नीचा ठावठिकाणा लावण्यासाठी त्यांनी तक्रार दाखल केली आहे. जितेंद्र यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या पत्नीचे होणाऱ्या जावयासोबत नियमितपणे २०-२० तास फोनवर संवाद होत असत, आणि त्यांच्या नात्यात प्रेमाची सुरुवात झाली होती.

मुलगी मात्र आपल्या आईच्या या कृतीने अत्यंत संतप्त आहे. तिच्या म्हणण्यानुसार, “आईने घरातील एकही रुपया न ठेवता सर्व काही घेऊन पळ काढलं आहे. आता ती जिवंत राहो वा मरो, मला काही फरक पडत नाही. पण तिने नेलेले दागिने आणि पैसे मात्र परत हवेत.”

प्राप्त माहितीनुसार, महिलेने काही दिवसांपूर्वीच आपल्या होणाऱ्या जावयाला स्मार्टफोन भेट दिला होता आणि त्यानंतर त्यांच्या संवादात वाढ झाली होती. शेवटी दोघांनी मिळून पळून जाण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू असून संबंधित महिला व तरुणाचा शोध घेतला जात आहे. कुटुंबीयांकडून या घटनेनंतर मोठ्या प्रमाणावर मानसिक आणि आर्थिक धक्का बसला असल्याचे सांगण्यात येत आहे.

Protected Content