
एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील काही शेतकऱ्यांच्या मालकीच्या जमिनीत सनशुअर पार्क एनर्जी (हरियाणा स्थित कंपनी) व ओअॅसिस एनर्जी सोल्युशन यांनी १३२ केव्ही सबस्टेशनसाठी विनापरवानगी पोल उभारले आहेत. या कामादरम्यान शेतांच्या बांधावर असलेली कडुलिंब, साग, आंबा, बाभूळ यांसारखी २० वर्षांपूर्वीची झाडे बेकायदेशीररित्या तोडण्यात आली आहेत.


शेतकऱ्यांनी पोल लावण्यासंदर्भात विचारणा केली असता संबंधित कंपनीचे पवार नामक अधिकारी उर्मटपणे वागत असून कंत्राटदार व त्यांचे सहकारी शेतकऱ्यांना दमदाटी करत असल्याचा आरोप आहे. या बेकायदेशीर कारवाईबाबत कंपनीकडे तक्रार दिली असता दखल घेण्यास टाळाटाळ केली जात आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी श्रीकांत देशमुख, संजय पल्लीवार, अविनाश पल्लीवार आणि इतर शेतकऱ्यांनी तहसीलदार प्रदीप पाटील यांच्याकडे लिखित तक्रार दाखल केली आहे. आता तहसील प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेते, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.


