फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । फैजपूर शहरात नवीन ग्रामीण रुग्णालय मंजूर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आ.अमोल जावळे यांना निवेदन सादर केले.


फैजपूर शहर आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांसाठी शासकीय रुग्णालय उपलब्ध नसल्यामुळे रुग्णालय मंजुरीची मागणी करण्यात आली आहे. नगरपरिषद संचालित रुग्णालयात प्रसूती विभागातील कर्मचारी सेवानिवृत्त झाल्याने प्रसूती विभाग बंद पडला आहे. त्यामुळे परिसरातील महिलांना प्रसूतीसाठी दूरदूरच्या ठिकाणी जावे लागत आहे. गरीब, मजूर, दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याक महिलांना खाजगी रुग्णालयांचा अवाढव्य खर्च परवडत नसल्याने त्यांच्या आरोग्यासाठी नवीन ग्रामीण रुग्णालयाची आवश्यकता भासते. नवीन ग्रामीण रुग्णालय मंजूर झाल्यास ३० खाटांची सुविधा, प्रसूतीविभाग २४ तास कार्यरत राहणार आहे. याशिवाय लहान-मोठ्या शस्त्रक्रिया, औषधे, एक्स-रे मशीनसारख्या अत्याधुनिक आरोग्य सुविधांचा लाभ स्थानिक नागरिकांना मिळेल.
फैजपूर शहरासाठी नगरपालिकेला शासकीय जागा रुग्णालयासाठी हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळावी आणि ग्रामीण रुग्णालयाची स्थापना व्हावी, यासाठी आमदार अमोलदादा जावळे यांनी शासनाकडे विशेष लक्ष द्यावे, अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली. या प्रसंगी माजी उपनगराध्यक्ष शेख कुरबान शेख करीम, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष शेख नाशिर हुसेन हाजी करीम, तालुका उपाध्यक्ष अशोक भालेराव, भुपेंद्र सोनवणे, अख्तर पहलवान, शेख निसार गफ्फार कुरेशी, कुरेशी जलीलखान अस्लमखान आणि फैजपूर शहरातील पदाधिकारी उपस्थित होते.


