आहारतज्ञ डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्या परिसंवादाला अधिकारी, कर्मचाऱ्यांचा प्रतिसाद..!

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | दैनंदिन शासकीय कामकाज करत असतांना अधिकारी व कर्मचारी यांना विविध आरोग्य विषयक अडचणींचा सामना करावा लागत असतो. त्यामुळे सतत ताण तणावात राहिल्याने त्यांच्या आरोग्यावर याचा विपरीत परिमाण होण्याची शक्यता असते. सम्यक आहार व नियमित व्यायामाने आरोग्य सुस्थितीत राहते व आरोग्यास देखील याचा फायदा होतो. त्यानुषंगाने जळगावाचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या निर्देशानुसार जळगाव जिल्ह्यातील शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्याकरिता आहारतज्ञ डॉ. जगन्नाथ दिक्षित यांनी जळगावातील जिल्हा नियोजन सभागृह येथे शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आयोजीत परिसंवादात मार्गदर्शन केले.


या सेमिनारमध्ये डॉ. दीक्षित यांनी मधुमेह, वजन नियंत्रण, औषधांवर नियंत्रण करण्याबाबत तसेच मधुमेहाचे प्रकार, कारण व उपाय याबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी दीक्षित लाईफ स्टाईल बद्दल देखील सांगितले. ज्यात 55 मिनिटांच्या आत जेवण पूर्ण करणे, दिवसातून दोनच वेळा जेवण करणे, नियमित व्यायाम करणे, 45 मिनिटे पायी चालणे असे काही उपाय सांगितले. या परिसंवादाला सर्व अधिकारी व कर्मचारी यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे,निवासी उपजिल्हाधिकारी भिमराज दराडे व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content