खान्देश केटरिंग असोसिएशनतर्फे ‘फॉस्टेक’ प्रशिक्षण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आपल्या व्यवसायात टापटीपपणा ठेवा. भोजन उत्कृष्ट पद्धतीने तयार करून किचनमध्ये कायम स्वच्छता ठेवा. चांगल्या बाबींवर भर देऊन व्यवसायात सातत्याने अपडेट राहा, उत्कृष्ट अन्नसेवेतून चांगली लोकप्रियता घडून येते असे प्रतिपादन आ. राजूमामा भोळे यांनी केले.

खान्देश केटरिंग असोसिएशन, जळगांव व अन्न व औपथ प्रशासन विभाग जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने जळगांव जिल्ह्यातील केटरिंग सेवा पुरविणारे सर्व अन्न व्यावसायिक यांचेसाठी आज दि.०९ जानेवारी रोजी केमिस्ट भक्न येथे सकाळी ११.०० वाजता पी-टेक सोल्ल्युशन याच्यामार्फत फॉस्टेक प्रशिक्षण आयोजीत करण्यात आले होते. उदघाटनावेळी मंचावर अध्यक्षस्थानी आ. राजूमामा भोळे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून अन्न व औषध विभागाचे सहायक आयुक्त संतोष कांबळे, जीएम फाउंडेशनचे आरोग्यदूत पितांबर भावसार, असोसिएशनचे अध्यक्ष सत्यनारायण जोशी, उपाध्यक्ष गोपाल अग्रवाल, सचिव रतन सारस्वत, सहसचिव दिनेश टाटिया, खजिनदार राजेंद्र वैष्णव उपस्थित होते.

सुरुवातीला दीपप्रज्वलन करून महादेव-पार्वती यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर प्रस्तावनेतून सचिव रतन सारस्वत यांनी असोसिएशन व कार्यक्रमाविषयी माहिती दिली. सहायक आयुक्त संतोष कांबळे यांनी मनोगतातून अन्न व औषध मानकाबाबत माहिती दिली. यानंतर अध्यक्षस्थानावरून बोलताना आ. भोळे म्हणाले की, अन्न व्यावसायिकांनी किचनमध्ये काम करताना स्वच्छतेसाठी काळजी घ्यावी. उरलेल्या अन्नाची नासाडी टाळण्यासाठी सामाजिक संस्थांशी स्वतःला जोडून घ्या. म्हणजे गरजूंना उरलेले अन्न देऊन परोपकार साधता येईल, असे सांगून केटरिंग कामासाठी बालकामगार ठेऊ नका, १८ वर्षांवरील कामगार पहा. कामगारांप्रती कायम आपुलकी ठेवा, असेही सांगितले. सूत्रसंचालन संजय दुसाने यांनी केले. आभार उपाध्यक्ष गोपाल अग्रवाल यांनी मानले. प्रशिक्षणासाठी जिल्हाभरातून १२० केटरिंग असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते.

दिवसभरात प्रशिक्षण
अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाने नागरिकांना सुरक्षित अन्न आणि निरोगी आहाराची उपलब्धता, वापर सुनिश्चीत करून भास्ताच्या अन्न सुरक्षा आणि पोषण परिवर्तन घडवुन आणण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्या अनुषंगाने हा उपक्रम घेण्यात आला. दिवसभर प्रशिक्षणात केटरिंग व्यवसायातील परवान्याबाबत सहायक आयुक्त संतोष कांबळे यांनी माहिती दिली. तर फास्टॅक विषयी पी-टेक सोल्युशनच्या वृषाली दुबे यांनी सविस्तर सांगितले. खाद्य उद्योगात कुशल/प्रशिक्षित मनुष्यबळाची उपलब्धता वाढवणे, जबाबदार खाद्य व्यवसायांद्वारे कायदा, नियम आणि नियमांचे स्वयं-अनुपालन करण्यासाठी सुधारित वातावरण तयार करणे, वर्तणुकीत बदल घडवून आणणे आणि देशात अन्न सुरक्षेची संस्कृती रुजवणे याविषयी माहिती सांगण्यात आली.

खराब तेलापासून बनणार ‘बायोडिझेल’
केटरिंग व्यवसायात अनेकदा तेलापासून खाद्यपदार्थ तयार केले जातात. त्यानंतर उरलेले तेल अखाद्य म्हणून अनेकवेळा टाकून देण्याची वेळ येते. याऐवजी हे खराब तेल विकत घेऊन त्याचा बायोडिझेल बनविण्यासाठी पुनर्वापर करण्यात येईल, अशी माहिती ‘रुका’प्रकल्पाचे तसेच हरिओम सर्व्हिसेसचे महेश बजाज यांनी उपस्थित व्यावसायिकांना माहिती देऊन सांगितली.

 

Protected Content