अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील कळमसरे गावात गेल्या आठ वर्षापासून मरीआईचा यात्रोत्सवाचे जल्लोषात आयोजन केले जाते. या अनुषंगाने यंदा देखील यात्रोत्सवाचे आयोजन झाले आहे, मंगळवारी ७ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता भाविकांच्या मोठ्या उपस्थितीत ध्वज मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भाविकांमध्ये जल्लोषाचे वातावरण पहायला मिळाले.
अमळनेर तालुक्यातील कळमसरे गावात तशा ग्रामदेवता भवानी आई तसेच मरीआई अशा दोन यात्रा भरतात. मरीआईची यात्रा दरवर्षी जानेवारी महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या मंगळवारी भरवली जाते. या दिवशी संपूर्ण गावातून बँड पथक सहवाद्य मोठी मिरवणूक निघते, या मिरवणुकीत गावातील महिला अबाल वृद्ध स्वयंपूर्तीने सहभागी होत असतात. कळमसरे येथील मरीआईचा भक्त हेमंत करडे हा मिरवणूक दरम्यान घरापासून ते थेट मंदिरापर्यंत नृत्य करीत मंदिरावर ध्वज पताका लावत असतो. गावातील व परीसरातील श्रोते यांच्या लोकमनोरंजनासाठी खान्देश भूषण भीमा नामा लोकनाट्य तमाशा मंडळ यांचा कार्यक्रम सायंकाळी होत आहे. या यात्रोत्सव काळात हॉटेल्स, झुले पाळणे, खेळणी दुकाने,संसारोपयोगी साहित्यचे दुकानदार दोन दिवस आधीच दाखल झाले. यात्रे काळात भाविकांनी व जनतेने शांतता प्रस्थापित ठेवून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन आयोजक व ग्रामपंचायत कळमसरे यांच्या वतीने करण्यात आले आहे.