Home Cities अमळनेर ‘माहेरचा पारिजात’ उपक्रमात अमळनेरच्या लेकींचा जल्लोष ; माहेरवाशिणींनी अनुभवली पक्ष्यांची सुमधुर दुनिया...

‘माहेरचा पारिजात’ उपक्रमात अमळनेरच्या लेकींचा जल्लोष ; माहेरवाशिणींनी अनुभवली पक्ष्यांची सुमधुर दुनिया व श्री कपिलेश्वराचे दर्शन

0
8


अमळनेर- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर महिला मंच ट्रस्टतर्फे अमळनेरच्या लेकींसाठी आयोजित ‘माहेरचा पारिजात’ या भव्य स्नेहमेळ्याचा दुसरा दिवस महिलांसाठी अत्यंत आनंददायी, उत्साही आणि आठवणींचा सुवर्णकाळ ठरणारा ठरला. बालपणीच्या आठवणींना उजाळा देत आणि निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवत सर्व माहेरवाशिणींनी पक्ष्यांच्या चिवचिवाटापासून ते कपिलेश्वर महादेवाच्या दर्शनापर्यंत आणि पारंपरिक खेळांपासून ते सांस्कृतिक कार्यक्रमांपर्यंत विविध उपक्रमांचा मनमुराद आनंद लुटला.

शनिवार दि. २९ ऑगस्ट रोजी सुरू झालेल्या या स्नेहमेळ्यात मंगळग्रह मंदिरात रात्रभर खेळ, नृत्य आणि गप्पांची मैफल रंगली होती. त्यानंतर रविवारी, दि. ३० ऑगस्ट रोजी भल्या पहाटे पाच वाजता माहेरवाशिणींनी संतश्री सखाराम महाराज रोपवाटिकेत फेरफटका मारला. या ठिकाणी पक्ष्यांसाठी पाणी व धान्याची केलेली सोय आणि झाडांवर बांधलेली मडकी यांमुळे आश्रयाला आलेल्या शेकडो विविध पक्ष्यांचे दर्शन व त्यांचे कर्णमधुर आवाज ऐकून सर्व महिला भारावून गेल्या. ही पहाट त्यांच्यासाठी सुगंधी सुप्रभात सफर ठरली. येथे काही महिलांनी योगासने व व्यायाम केला. त्यानंतर सकाळी श्री मंगळग्रह देवांची सामूहिक आरती व अल्पोपहार आटोपून सर्व महिला अमळनेर डेपोच्या बसने तापी, पांझरा व लुप्त गंगा संगमावरील तीर्थक्षेत्र नीम येथील श्री कपिलेश्वर महादेव मंदिराकडे रवाना झाल्या.

कपिलेश्वर मंदिरात पोहोचल्यानंतर महिलांनी अत्यंत श्रद्धापूर्वक महादेवाचे पूजन करून अभंग व भजनांच्या गजरात आत्मानंद मिळवला. निसर्गाच्या रम्य वातावरणात भोजनाचा आस्वाद घेतल्यानंतर आणि हास्य-विनोदात वेळ घालवून पुन्हा मंगळग्रह मंदिर परिसर गाठला. दुपारी चार ते सहा या वेळेत महिलांनी पारंपरिक खेळ जसे की सागर गोटे, काचा-कवड्या, चौपट, आट्यापाट्या, तळ्यात-मळ्यात, लगोरी, आंधळी कोशिंबीर आणि संगीत खुर्ची खेळत आपले बालपण पुन्हा एकदा अनुभवले. सायंआरतीनंतर आयोजित गुणदर्शन कार्यक्रमातील मिमिक्री, नृत्य, गायन आणि रात्रीच्या शेकोटीने कार्यक्रमात रंगत आणली. या उपक्रमासाठी मंगळग्रह सेवा संस्थेचे विशेष सहकार्य लाभले असून अमळनेर महिला मंच ट्रस्टच्या अध्यक्षा सौ. कांचनताई शहा, उपाध्यक्षा सौ. तिलोत्तमाताई पाटील, सौ. सरोजताई भांडारकर, सचिव सौ. वसुंधराताई लांडगे व कोशाध्यक्षा प्रा. सौ. शीलाताई पाटील यांच्यासह सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


Protected Content

Play sound