



मुक्ताईनगर- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आचार्य भगवंत श्री विजय रत्नचंद्रसूरीश्वरजी महाराज साहेब (डहेलावाला) यांच्या बहन महाराज साहेब गुरुमैया पूज्य गुणदक्षाश्रीजी म.सा. यांच्या शिष्या प.पू.सा. श्री शाश्वतरत्नाश्रीजी म.सा. यांच्या शिष्या प.पू.सा. श्री शास्त्रलीनाजी म.सा. आदी ठाणा ५ यांच्या पावन निश्रेत मुक्ताईनगर शहरात चातुर्मास अत्यंत उत्साहात सुरू आहे. या चातुर्मासादरम्यान गुरू भगवंतांच्या दिव्य प्रेरणेतून मुक्ताईनगर शहरात ‘विमल विद्या तप’ हा विशेष धार्मिक उपक्रम अत्यंत उत्साहपूर्ण, मंगलमय व आध्यात्मिक वातावरणात पार पडला.
तब्बल २३ दिवस चाललेल्या या खडतर तपश्चर्येमध्ये समाजातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत म्हणजे लहान मुले, महिला व पुरुष अशा एकूण ४५ तपस्वींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून आपली साधना पूर्ण केली. तपश्चर्या पूर्ण झाल्यानंतर गुरू भगवंतांच्या पावन सान्निध्यात सर्व ४५ तपस्वींची मुक्ताईनगर शहरातून अत्यंत थाटामाटात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेदरम्यान जयघोषाच्या गजरात संपूर्ण मुक्ताईनगर शहर भक्तिमय रंगात न्हाऊन निघाले होते.
तपस्वींच्या आत्मबळाचे कौतुक करण्यासाठी आणि पूज्य गुरू भगवंतांचे पावन आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी जैन समाजबांधव तसेच नागरिक मोठ्या संख्येने शोभायात्रेत सहभागी झाले होते. गुरू भगवंतांच्या वेळोवेळी मिळालेल्या मार्गदर्शन आणि प्रेरणेमुळेच हा धार्मिक सोहळा निर्विघ्नपणे व अभूतपूर्व उत्साहात पार पडल्याची भावना समाजबांधवांनी व्यक्त केली असून, २३ दिवसांचे तप पूर्ण करणाऱ्या सर्व तपस्वींचे जैन समाजातून कौतुक व अभिनंदन केले जात आहे.



