महामेट्रो आणि आशियाई विकास बँक यांच्यात सामंजस्य करार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला गती आणि चालना मिळवण्यासाठी आशियाई विकास बँकेकडून 1527 कोटी रुपयांचे (200 मिलियन डॉलर) अर्थसहाय्य मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विधानभवनातील मंत्रिमंडळ सभागृहात आज यासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला. या करारामुळे नागपूर शहरासह परिसराच्या सर्वांगीण विकासाला आणखी वेग मिळणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर आणि आशियाई विकास बँकेच्या संचालक मिओ ओका यांनी अर्थसहाय्याच्या करारावर सह्या केल्या. नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याच्या प्रकल्पासाठी आशियाई विकास बँक आणि युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक यांच्याकडून एकूण 3586 कोटी रुपयांचा वित्तपुरवठा करण्यात येणार आहे. त्यापैकी 1527 कोटी रुपये आशियाई विकास बँकेकडून मिळणार आहेत. विशेष म्हणजे, हा वित्तपुरवठा जपानी येनमध्ये दिला जाणार आहे, ज्यामुळे महा मेट्रोला तुलनेने कमी व्याज दरावर कर्ज मिळेल. महामेट्रोला या कर्जाची रक्कम केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाच्या (MoHUA) माध्यमातून उपलब्ध केली जाणार आहे.

नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात एकूण 43.8 किलोमीटर लांबीचा मार्ग तयार होईल. यामध्ये खापरी ते एमआयडीसी इएसआर दरम्यान 18.5 किलोमीटर, ऑटोमोटिव्ह स्क्वेअर ते कन्हान नदी दरम्यान 13 किलोमीटर, प्रजापती नगर ते ट्रान्सपोर्टनगर दरम्यान 5.6 किलोमीटर आणि लोकमान्यनगर ते हिंगणा दरम्यान 6.7 किलोमीटरचा समावेश आहे. या प्रकल्पाचा लाभ नागपूर आणि त्याच्या आसपासच्या 10 लाख लोकांना होणार आहे. यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर आणि आशियाई विकास बँकेचे संचालक मिओ ओका उपस्थित होते.

Protected Content