न्यु बॉम्बे सुपर बेकरीमधून लाखो रूपयांचा साठा जप्त; अन्न-औषध प्रशासनाची कारवाई

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव जिल्हयात सुरु असलेल्या ख्रिसमस व नवीन वर्ष-2025 आगमनानिमित्त ‍विशेष तपासणी मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासन कार्यालयाने बेकरी तपासणी मोहीम तीव्र केलेली आहे. ग्राहकांच्या वाढत्या मागणीनुसार केक व खादयपदार्थांची विक्री सुरु आहे. या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाच्या जळगाव कार्यालयाकडून जिल्हयातील सर्व हॉटेल्स, केक उत्पादक व विक्रेते, बेकरी अन्न पदार्थ उत्पादक व विक्रेते अशा आस्थापनांची तपासणी केली जात आहे.

या तपासणीत आस्थापनांच्या उलाढालीनुसार परवाना-नोंदणी केली आहे का?, कामगारांचे वैदयकीय तपासणी अहवाल, अन्नपदार्थ तयार करण्यासाठी वापरलेल्या पाण्याचे अहवाल, कर्मचा-यांना योग्य प्रशिक्षण दिले आहे का? , सर्वसाधारण स्वच्छता, त्याप्रमाणे मुदतबाहय कच्चा माल व अन्नपदार्थांचा वापर होत आहे का? आदी बाबींची तपासणी केली जात आहे. याशिवाय बेक-यांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असलेले तयार अन्नपदार्थ व अन्नपदार्थ बनविण्यासाठी वापरले जाणारे घटकपदार्थ रवा, पीठ, मैदा, तूप आदींचे नमुने यांची तपासणी करण्यात येत आहे.

या मोहीमेअंतर्गत गोपनीय माहीतीच्या आधारे अन्न व औषध प्रशासन, यांचे पथकाने बुधवार 11 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता जळगावातील मेहरुण परिसरातील न्यू बॉम्बे सुपर बेकरी यांचा पेढीच्या तपासणी मध्ये साठा करुन ठेवलेला मावा टोस्ट व पिस्ता टोस्टचा 2792 किग्रॅ वजनाचा एकूण 3,31,440 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. या अन्न पदार्थावर पॅकींग तारीख्‍ तसेच बिलाचा उल्लेख नव्हता.
ही कारवाई ही अन्न सुरक्षा अधिकारी कि. आ. साळुंके व त्यांचे सहकारी अन्न सुरक्षा अधिकारी, के.एच.बाविस्कर, श.म.पवार यांनी अन्न व औषध प्रशासन, जळगाव या कार्यालयाचे सहायक आयुक्त संतोष कांबळे व मा. सह आयुक्त,(नाशिक विभाग) म.ना.चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे. जळगाव जिल्हयात अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने ‍विशेष तपासणी मोहिमेअंतर्गत तपासण्या करण्यात येणार असून स्वच्छ वातावरणात अन्न पदार्थ न तयार करणाऱ्या पेढयांविरुदध तीव्र कारवाई करणार असल्याची माहिती अधिका-यांनी दिली.

Protected Content