जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील राजमलती नगरात जुन्या वादातून एका महिलेचे बंद घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश करत घरातील सामानांची तोडफोड केली तर काही साहित्यांना आग लावून घर जाण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार २१ नोव्हेंबर रोजी दुपारी दीड वाजता घडला आहे. याप्रकरणी चौकशी अंती बुधवारी २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील राजमालती नगरात नाजेमा परवीन राजू पटेल वय -४६ या महिला आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. दरम्यान २१ नोव्हेंबर रोजी दुपारी दीड वाजता त्यांचे घर बंद असताना मंगेश (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) याने इतर सहा ते सात जणांच्या मदतीने नाजेमा परवीन पटेल यांच्या बंद घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश करत घरातील सामानांची तोडफोड केली, तसेच काही साहित्यांना आग लावून घर जाळण्याचा प्रयत्न केला. ही घटना घडल्यानंतर त्यांच्या शेजारी राहणाऱ्या महिलेने फोन करून नाजेमा पटेल यांना या घटनेची माहिती सांगितली. त्यानंतर महिलेने याबाबत बुधवारी २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार मंगेश (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) नितीन अहिरे, संजय रगडे, अमोल मोरे, राहुल मोरे व इतर अनोळखी व्यक्तींविरोधात जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र शिखरे हे करीत आहे.