संजय ब्राह्मणे मुक्ताईनगरमधून लढणार : मातब्बरांना भिडणार !

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते संजय पंडित ब्राह्मणे यांना मुक्ताईनगरातून वंचितची उमेदवारी जाहीर झाली असून या माध्यमातून ते मातब्बर उमेदवारांशी मुकाबला करणार आहेत.

बहुजन आघाडीने मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून पक्षाचे ज्येष्ठ नेते संजयदादा ब्राह्मणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. वंचितने आधी जिल्ह्यातून रावेर मतदारसंघातून शमीभा पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर पक्षाकडून अन्य ठिकाणी नेमकी कुणाला उमेदवारी मिळणार ? याबाबत मोठी उत्सुकता लागली होती. यानंतर संविधान आमचे संस्थापक अध्यक्ष जगनभाई सोनवणे यांना भुसावळातून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. यानंतर आता मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून संजय ब्राह्मणे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. पक्षाने आज जाहीर केलेल्या यादीत त्यांना स्थान मिळाले आहे.

संजय ब्राह्मणे यांनी अलीकडेच रावेर लोकसभा निवडणूक लढविली होती. यानंतर आता ते मुक्ताईनगरातून जनतेच कौल मागत आहेत. वंचितचा उच्चशिक्षित आणि स्वच्छ प्रतिमेचा चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचे शिक्षण बी. ई. सिव्हील झाले असून सार्वजनीक बांधकाम खात्यात अधिकारी म्हणून त्यांनी दोन दशके काम केले. यानंतर 2014 मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेऊन ते राजकारणात आले आहेत.

मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात आमदार चंद्रकांत पाटील हे शिवसेनेकडून महायुतीचे उमेदवार तर शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे या महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून रिंगणात उतरल्या आहेत. यातच आता वंचितच्या तिकिटावरून संजय ब्राह्मणे यांच्यासारखा सुशिक्षित व सर्वार्थाने प्रबळ असणारा उमेदवार देखील मुक्ताईनगरातून लढत असल्याने येथील लढत ही अतिशय रंगतदार होण्याचे संकेत आहेत.

Protected Content