दीपनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दीपनगर येथील औष्णिक विद्यूत केंद्राच्या ६६० मेगा वॅटच्या प्रकल्पात गुरूवारी २४ ऑक्टोबर रोजी झालेल्या अपघातात काम करणाऱ्या परप्रांतीय कामागाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मयत कामगार हा बिहार येथील रहिवाशी असल्याचे समोर आले आहे. या घटनेची चौकशी करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली जात आहे.
शासनाकडून करोडो रूपये खर्च करून भुसावळ तालुक्यातील दीपनगर येथील ६६० मेगावॅट विद्यूत प्रकल्प उभारण्याचे काम भेल कंपनीला दिलेले आहे. कंपनीने बॉयलर उभारणीतील काही काम इंडवेल या कंपनीला दिले असून या कामाचा सब कंत्राट आर.ए.इंटरप्रायजेस या फर्मला देण्यात आला असून मृत कामगार हा आर.ए.इंटरप्रायजेसचा आहे. यासंदर्भात भेल कंपनीचे डायरेक्टर दिनेश जावडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अपघाताची माहिती देण्यास टाळाटाळ केली आहे.
दरम्यान, प्रत्यक्षदर्शनी अपघात घडल्यानंतर कामागाराचा मृत्यू झाला होता. प्रसारमाध्यमांशी माहिती लपवून ठेवण्यासाठी तसेच अपघात प्रकरण दडपण्यासाठी भेल कंपनीने विद्यूत प्रकल्प प्रशासनाला कोणतीही माहिती न देता परस्पर अपघातग्रस्ताला खासगी वाहनातून भुसावळ येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी नेत असल्याचा बनाव केल्याचे बोलले जात आहे. प्रस्तूत प्रतिनिधी यांनी कामगाराची माहिती घेण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केली असता कुणालाही अपघातग्रस्त मयत कामागाराचे नाव, गाव आणि त्याबाबतची प्राथमिक माहिती सांगता आली नाही.
दरम्यान, शासनाचा इतका मोठा प्रकल्प उभारणीचे काम सुरू असतांना या ठिकाणी काम घेतलेल्या भेल कंपनीने व्यवसायजन्य आरोग्य विषयक संस्था (OHC) स्थापित करून त्या ठिकाणी २४ तासांसाठी कामगारांकरिता डॉक्टारांची नियुक्ती करणे गरजेचे असतांना भेल कंपनीने कुठलीही उपाययोजना न केल्याचे आढळून आले. एवढेच नाही तर प्रकल्प उभारणी ठिकाणी कोणतीही रूग्णवाहिका आढळून आली नाही. भेल कंपनीकडून औद्योगिक सुरक्षतेचे कोणतीही नियम पाळले जात नसून बऱ्याच कामगारांना जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे अपघाताची सखोल चौकशी करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली जात आहे.