दिपनगरच्या नवीन प्रकल्पात दुर्घटना : दोन कामगार जखमी

दिपनगर, ता. भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील 660 मेगॅवॅटच्या नवीन प्रकल्पात स्फोट झाल्याने दोन कामगार गंभीर जखमी झाल्याची दुर्घटना घडली आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, दिपनगरच्या नवीन 660 मेगावॅट क्षमतेच्या प्रोजेक्टमध्ये गॅस कटींगचे काम सुरू असतांना अचानक मोठा स्फोट झाला. या दुर्घटनेत फुलगाव येथील दीपक बाविस्कर तसेच परप्रांतीय अमितकुमार हे दोन कंत्राटी कामगार जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन्ही कामगार हे पॉवर मेक या खासगी कंपनीचे कामगार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या ठिकाणी अनेकदा लहानमोठे अपघात घडत असतात. तथापि, स्फोट झाल्यावर देखील जखमी कर्मचाऱ्यांना अगदी लागलीच प्रथमोपचार देखील मिळाले नाहीत.

दोन महिन्यांपूर्वी देखील याच ठिकाणी असाच अपघात झाला होता. तथापि, स्थानिक प्रशासन व संबंधीत कंपनीने हे प्रकरण दडपून टाकले होते. यामुळे या स्फोटाची चौकशी करून दोषींवर कार्यवाही तर जखमी झालेल्या कामगारांना योग्य ती भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.

दिपनगर औष्णीक विद्युत प्रकल्पात सुरक्षाविषयक अनेक त्रुटी असल्याने लहान-सहान चोऱ्या होत आहेत. या संदर्भात प्रसारमाध्यमांनी वृत्त प्रकाशित करून देखील काहीही दळल घेण्यात आलेली नाही. तर, याच्या जोडीला कामगारांच्या सुरक्षेचा मुद्दा देखील ऐरणीवर आल्याने विद्युत मंडळाच्या प्रशासनाने याकडे गांभिर्याने पाहून तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे. अन्यथा, भविष्यात येथे मोठी दुर्घटना होण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.

Protected Content