कर्मचाऱ्यांना शौचालयात कोंबून ‘ते’ दरोडेखोर बँक मॅनेजरच्याच दुचाकीवरून झाले पसार !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील कालिंकामाता मंदीर परिसरातील स्टेट बँकेच्या शाखेत आज सकाळी नऊ वाजता दोन जणांनी सशस्त्र दरोडा टाकण्यात आला. यात बँक मॅनेजरवर धारदार चाकूने मांडीवर वार करून गंभीर जखमी करून लॉकर्समधील लाखो रूपयांची रोकड आणि सोन्याचे दागिने  असा ऐवज लुटून नेला. यावेळी दरोडेखोरांनी बँकेतील मॅनेजरचीच दुचाकी घेवून चोरटे पसार झाल्याचे समोर आले.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील कालिंका माता मंदीर ते काशीबाई उखाजी शाळ भारतीय स्टेट बँकेची शाखा आहे. नेहमीप्रमाणे गुरूवारी १ जुन रोजी सकाळी ९ वाजता शाखा उघडण्यात आली होती. त्यावेळी कार्यालयीन चार ते पाच कर्मचारी उपस्थित होते. सव्वा नऊ वाजेच्या सुमारास दोन अनोळखी डोक्यात हेल्मेट घालून बँकेत घुसले. बँकेत हजर असलेल्या पाच ते सहा कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करत त्यांच्याजवळील मोबाईल हस्तगत केला. त्यानंतर धमकावत सर्व कर्मचाऱ्यांना कार्यालयातील शौचालायत कोंबून दिले.  त्यानंतर बँक मॅनेजर राहूल मधुकर महाजन यांच्याकडे जावून लॉकरच्या चाव्या मागितल्या. याला प्रतिकार केल्यानंतर एका दरोडेखोराने हातात असलेल्या धारदार चाकून मॅनेजरच्या मांडीवर सपासप वार करून गंभीर जखमी केले. बँकेतील कर्मचारी नयन गिते यांच्यावर देखील वार केल्याने हाताच्या बोटाला दुखापत केली. त्यानंतर दोन्ही दरोडेखोरांनी मॅनेजरला चाकूचा धाक दाखवून लॉकर उघडवून घेतले. लॉकरमध्ये ठेवलेली अंदाजे १५ ते १७ लाख रूपयांची रोकड आणि हातात मिळेल तेवढे सोने (अंदाजे एक ते दीड किलो सोने) असा मुद्देमाल आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर चोरला. विशेष म्हणजे आलेल्या दोन्ही दरोडेखोर येतांना पायी डोक्यात हेल्मेट घालून आले होते. त्यानंतर बँक मॅनेजरचीच दुचाकी घेवून पसार झाले.

 

दरम्यान, काही वेळाच्या आतच शनीपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी, गुन्हे शाखेचे शोध पथक, यांनी बँकेत धाव घेतली. जखमी झालेल्या व्यवस्थापकांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  श्‍वास पथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले असून पुढील चौकशीला सुरूवात करण्यात आली आहे. याप्रसंगी पोलीस अधिक्षक एम राजकुमार, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गावळी, सहाय्यक पोलीस अधिक्षक संदीप गावीत, शनीपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके, जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह आदी उपस्थित होते.

Protected Content