जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चुक झाली तर ती स्वीकारा, त्याबद्दल पश्चाताप करा आणि त्यात सुधारणा होण्याकरिता प्रायश्चित अवश्य करा, हे महात्मा गांधीजींनी सांगितलेल्या तत्वाचे सुत्र प्रत्येकाने अंगिकारावे. तन व मन स्वच्छ ठेवून कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता शुद्ध आचारण ठेवून अहिंसा, शांतीतून समर्थ भारत घडवूया असा मोलाचा संदेश गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरु व गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संचालक डॉ.सुदर्शन अय्यंगार यांनी दिला.
महात्मा गांधी जयंती तसेच लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या औचित्याने गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे लाल बहादूर शास्त्री टॉवरपासून अहिंसा सद्भावना शांती यात्रेचे आयोजन केले होते. यात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला. लाल बहादूर शास्त्री टॉवर येथे मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करुन अहिंसा सद्भावना शांती यात्रेची सुरवात झाली. यावेळी डॉ.. सुदर्शन अय्यंगार, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अशोक जैन यांच्यासह मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखविली. ही यात्रा नेहरू चौक – छत्रपती शिवाजी महाराज चौक – डॉ. हेडगेवार चौक – स्वातंत्र्य चौक मार्गे महात्मा गांधी उद्यानात पोहोचली. त्यावेळी झालेल्या सभेत डॉ.. सुदर्शन अय्यंगार बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर खासदार स्मिताताई वाघ, आ. सुरेश भोळे, जैन इरिगेशनचे अध्यक्ष व गांधी रिसर्च फाऊंडेशनचे विश्वस्त अशोक जैन, उपाध्यक्ष अनिल जैन, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, दिल्ली विद्यापीठाचे पुलिन नायक, डॉ.. भरत अमळकर, माजी महापौर जयश्रीताई महाजन, ज्योती जैन, डॉ.. गीता धरमपाल आदी मान्यवर उपस्थित होते. अहिंसा सदभावना यात्रेत अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, डॉ.. शेखर रायसोनी, राजेंद्र मयूर, अनिश शहा, शिरीष बर्वे, अमर जैन, डॉ.. राजेश पाटील, उपायुक्त अविनाश गांगुर्डे, मनपा आरोग्य अधिकारी उदय पाटील, एजाज मलिक, विनोद देशमूख, दीपक सूर्यवंशी, विष्णु भंगाळे, शिवराम पाटील, प्रवीण पगारीया, शोभना जैन, निशा जैन, डॉ.. भावना जैन यांच्यासह रोटरी परिवारातील सदस्य शहरातील विविध शैक्षणिक संस्थांचे विद्यार्थी, मुख्याध्यापक शिक्षक, एनसीसी व एनएसएस चे विद्यार्थी, जैन उद्योग समूहातील सहकारी उपस्थित होते. अहिंसा सदभावना यात्रेचा समारोप महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करुन झाले. महात्मा गांधी उद्यानातील सभेची सुरुवात लालबहादूर शास्त्री व महात्मा गांधी यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. आरंभी अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांनी वैष्णव जन तो.. हे भजन म्हटले. यानंतर सर्वधर्म प्रार्थना झाली. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी अहिंसेची प्रतिज्ञा उपस्थितांना दिली. गिरीष कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.
डॉ.. सुदर्शन अय्यंगार म्हणाले की, महात्मा गांधीजी हे देशासाठी जगले म्हणून ते आजही स्मरणात आहेत. त्यांनी आपल्या 78 वर्षाच्या आयुष्यात 178 उपवास केले. समाज, राष्ट्रासाठी उपवास करताना आपल्यापेक्षा लहानांनी चुक केली असेल तर ती पालक म्हणून स्वीकारली व त्याचे प्रायाश्चित केले. आपल्या आयुष्यातील अनमोल असे 8 वर्षे त्यांनी कारागृहात घालविली. आजही महात्मा गांधीजींचे विचार, मुल्ये यावर आचरण केले जाते याबाबत गोष्टी स्वरूपात डॉ.. सुदर्शन अय्यंगार यांनी उपस्थितांशी संवाद साधला. चुक ही व्यक्ती, परिवार, समाजात आर्थिक व्यवहारात, राजनैतिक व्यवहारात यासह कुठल्याही क्षेत्रात होऊ शकते. ती लहान असो किंवा मोठी असो त्याचे परिमार्जन हे स्विकृती, पश्चाताप आणि त्याचे प्रायश्चीत या तिनही गोष्टी केल्यानेच मनुष्याच्या चरित्र्यात सुधारणा होईल. यातून व्यक्तीमत्व घडेल आणि राजकिय नेतृत्त्व चारित्र्य संपन्न होईल असा संदेशही डॉ.. सुदर्शन अय्यंगार यांनी दिला.