रेकार्डवरील गुन्हेगारावर एमपीडीए अंतर्गत स्थानबध्दतेची कारवाई

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील फैजपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील वाळू माफिया असलेला गुन्हेगारावर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी एमपीडीए अंतर्गत मोठी कारवाई करत त्याच्यावर स्थानबध्दतेची कारवाई करण्याचे आदेश आदेश शुक्रवारी ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता काढले आहे. ज्ञानेश्वर नामदेव तायडे उर्फ नाना कोळी वय-३६, रा. कोळन्हावी ता.यावल असे स्थानबद्ध केलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराचे नाव आहे.

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, फैजपूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत राहणारा रेकॉर्डवरील वाळू माफिया गुन्हेगार ज्ञानेश्वर नामदेव तायडे उर्फ नाना कोळी यांच्यावर पोलीस ठाण्यात वाळू तस्करीसह विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर आतापर्यंत वेगवेगळे ९ गुन्हे दाखल आहेत. दरम्यान फैजपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार ज्ञानेश्वर तायडे याच्यावरती एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करून तो पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्याकडे सादर केला. त्यानंतर महेश्वर रेड्डी यांनी हा प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रस्तावाचे अवलोकन केल्यानंतर रेकॉर्डवरील गुन्हेगार ज्ञानेश्वर तायडे याला एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्याबाबतच्या आदेशाला मंजूरी दिली आहे. त्याला कोल्हापूर येथील मध्यवर्ती कारागृह येथे स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले.

त्यानुसार फैजपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे, पोलीस उपनिरीक्षक मोहसीन सय्यद, सहायक फौजदार योगेश मालविया, पोलीस कॉन्स्टेबल योगेश महाजन समाधान पाटील, अनिल पाटील यांनी गुन्हेगाराला ताब्यात घेऊन कोल्हापूर येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यासाठी रवाना झाले. अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी सायंकाळी ६ वाजता दिलेल्या प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

Protected Content