अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील लोण खुर्द येथील रेशन दुकानदाराने लाभार्थ्यांचे रेशनधान्याची परस्पर विल्हेवाट लावून शासनाची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पुरवठा निरीक्षक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोण खुर्द येथील रेशनदुकानदार महिलेवर मारवड पोलीसात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील लोण खुर्द गावात रेशन दुकान क्रमांक ७२ हे रमनबाई प्रल्हाद पाटील ह्या चालवतात. शासनाच्या वतीने जुलै २०२४ मध्ये दिलेला रेशनधान्याचा कोटा हा जुन २०२४ मध्ये देण्यात आला होता. दरम्यान, रेशनदुकानदार रमनबाई पाटील यांनी जुलै महिन्यातील धान्याचा कोटा हा जून महिन्यात वाटून ते लाभार्थ्यांना जुलै महिन्याचे धान्य दिल्याचे भासवले. त्यानंतर रेशन धान्याची परस्पर विल्हेवाट लावून शासनाची आणि लाभार्थ्यांची फसवणूक केली आहे. दरम्यान हा प्रकार १ जून ते २० ऑगस्ट दरम्यान घडला आहे. हा प्रकार अमळनेर येथील पुरवठा निरीक्षक निंबा जाधव यांच्या लक्षात आला. त्यानुसार त्यांनी मारवड पोलीसात तक्रार दिली. त्यानुसार मारवड पोलीसात रेशनदुकानदार रमनबाई प्रल्हाद पाटील रा. लोण खुर्द ता.अमळनेर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.