भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील नगरपालिकेच्या इमारतीमधील दुकाने निरीक्षक यांच्या कार्यालयातून गोदरेज कपाटासह महत्वाच्या नोंदवह्यांची चोरी झाल्याची धक्कादायक प्रकार १६ जुलै रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी चौकशी अंती अखेर मंगळवारी ६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ नगरपालिकेच्या इमारतीमधील दुकाने निरीक्षक यांच्या कार्यालयात असलेले कपाटात महत्वाच्या नोंदी ठेवण्यात आलेल्या आहेत. १६ जुलै रोजी सकाळी १० वाजेच्या पुर्वी अज्ञात चोरट्यांनी कार्यालयातून कपाटासह महत्वाच्या दुकानासंदर्भात नोंदवह्यांची चोरी झाल्याची घटना समोर आली. दरम्यान याबाबत नगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी यांनी शोध घेतला परंतू या संदर्भात कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर मंगळवार ६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात दुकाने निरीक्षक जगदीश कौतीक पाटील यांनी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ विजय नेरकर हे करीत आहे.