मुंबई प्रतिनिधी । राज्य विधानसभेतील या पंचवार्षिकच्या शेवटच्या दिवशी एकनाथराव खडसे भावूक झाले. आपल्याला भ्रष्टाचाराचा डाग घेऊन सभागृहातून जायचे नसल्याचे उदगार त्यांनी काढले.
या पंचवार्षीकमधील विधीमंडळाचा आजचा शेवटचा दिवस होता. या दिवशी सभागृहात बोलतांना भाजपचे ज्येष्ठ नेते आ. एकनाथराव खडसे भावूक झाले. ते म्हणाले की, मी जे भोगलं त्याबद्दल आजही मनात वेदना आहेत. कुणाच्या जीवनात हा प्रसंग येऊ नये. माझ्या आयुष्यात यापेक्षा वाईट होण्याची शक्यता नाही. माझ्यावर सभागृहातील एकही सदस्याने आरोप केले नाहीत. आरोप करणारे बाहेरचे होते. माझे अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या बायकोशी बोलल्याचे संबंध जोडले गेले. नाथा भाऊमध्ये तिला एवढं काय आवडलं? आमचं सरकार पारदर्शी असल्यामुळे चौकशी झाली. चौकशीत समोर आलं की माझं दाऊदच्या बायकोशी कुठलंही संभाषण झालं नाही. आता माझ्यावर आरोप करणारा मनीष भंगाळे कुठे आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ते म्हणाले की, माझ्या आयुष्यात वडिलोपार्जित इस्टेटशिवाय काही नाही. वडील श्रीमंत होते. माझ्या शेतीच्या व्यतिरिक्त एकही उद्योग नाही. आयुष्यात पथ्य पाळलं. इतर उद्योग करायचे टाळले. मी काय चोर, बदमाश आहे का? एवढ्या चौकशा कशा झाल्या? एवढे आरोप झाले की एका सन्माननीय सदस्याला या सभागृहातून जाताना वेदना होत असल्याचे एकनाथराव खडसे म्हणाले.