केदारनाथ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील केदारनाथ यात्रेच्या मार्गावर दगड पडून तीन भाविकांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात 8 जण जखमी झाले आहेत. गौरीकुंडपासून तीन किमी अंतरावर चिरवासा येथे बांधलेल्या पदपथावरून हे यात्रेकरू केदारनाथ धामकडे जात असताना सकाळी साडेसातच्या सुमारास त्यांच्यावर दगड पडला.
रुद्रप्रयाग जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे नंदन सिंह राजवार यांनी अपघाताची माहिती दिली आहे. राजवार म्हणाले की, मृतांमध्ये महाराष्ट्रातील नागपूर येथील किशोर अरुण परते, जालना येथील सुनील महादेव काळे आणि रुद्रप्रयाग येथील अनुराग बिष्ट यांचा समावेश आहे. अपघातानंतर एसडीआरएफच्या पथकांनी ढिगाऱ्याखालून 8 जणांची सुटका केली. हे सर्व जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.