मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगावातील तरूणाला तालुक्यातील कुंड जवळच्या जंगलात मारून पुर्णा नदीपात्रात फेकून देण्याची भयंकर घटना घडली असून या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत.
या संदर्भात ‘लाईव्ह ट्रेंडस न्यूज’च्या प्रस्तुत प्रतिनिधीने मुक्ताईनगर स्थानकाचे निरिक्षक नागेश मोहिते यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी याबाबतची माहिती दिली. यानुसार, जळगाव येथील नितीन साहेबराव पाटील (वय २४ वर्षे ) या तरूणाला काही जणांनी काल पैशांच्या वादातून मुक्ताईनगर येथे नेले होते. मात्र त्याचा संपर्क होत नसल्याने त्याचे कुटुंबिय हे मुक्ताईनगर पोलीस स्थानकात आले. याप्रसंगी नितीन पाटील यांच्या सोबत असणारा एक युवक देखील पोलीस स्थानकात आला. या तरूणाने काही जणांनी नितीनला कुंड गावाजवळच्या जंगलात मारून त्याचा मृतदेह पुर्णा नदीच्या पात्रात टाकून दिल्याचे सांगितले.
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी माहिती देणार्या तरूणाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणात अन्य आरोपींचा सहमाग असून त्याचा तपास देखील सुरू आहे. तर, आज सकाळपासून पुर्णा नदीच्या पात्रात संबंधीत तरूणाचा मृतदेह शोधण्याची मोहिम सुरू करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरिक्षक नागेश मोहिते यांनी लाईव्ह ट्रेंडस न्यूजला दिली.