विशाळगडावरील दंगलीनंतर शाहू महाराजांनी दिली भेट

कोल्हापूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | विशाळगडाच्या परिसरात रविवारी जिल्हा प्रशासनाने केलेल्या अतिक्रमणविरोधी कारवाई आणि त्यापूर्वी झालेल्या हिंसाचारामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील वातावरण तणावपूर्ण आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी मंगळवारी विशाळगडाला भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. यावेळी शाहू महाराज दिसताच महिलांनी टाहो फोडला. यापूर्वी पोलिसांनी शाहू महाराजांना विशाळगडाच्या वादग्रस्त परिसरात जाण्यापासून मज्जाव केला. शाहू महाराजांनी आपल्याला पोलिसांनी अडवल्याचे सांगितले. यानंतर शाहू महाराजांनी विशाळगडाच्या परिसरातील तोडफोड झालेल्या मशि‍दीची पाहणी केली. यावेळी स्थानिकांनी आपल्या व्यथा शाहू महाराजांसमोर मांडल्या.

विशाळगड परिसरातील जिल्हा प्रशासनाच्या कारवाईनंतर कोल्हापूरमधील राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. शाहू महाराज यांचे पुत्र संभाजीराजे यांनी गेल्या काही दिवसांपासून विशाळगडावरील अतिक्रमण विरोधात आक्रमक भूमिका घेतलेली पाहायला मिळत आहे. यानंतर संभाजीराजे छत्रपती विशाळगडाच्या परिसरात गेले होते. तेव्हा काही जणांचा जमाव हिंसक झाला होता आणि त्यांनी विशाळगडाच्या परिसरात तोडफोड केली होती. या पार्श्वभूमीवर शाहू महाराजांनी नुकसानग्रस्तांची पाहणी करून त्यांना मदत कशी मिळेल याची ग्वाही दिली. शाहू महाराजांनी विशाळगडाच्या परिसरात घडलेल्या हिंसाचाराच्या घटनेचा निषेध केला होता. विशाळगड परिसरात नुकसान झालेल्यांना सरकारने तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी देखील शाहू छत्रपती यांनी केली होती. ही घटना म्हणजे जिल्हा प्रशासन आणि पोलिसांचे अपयश असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

Protected Content