अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील कळमसरे येथील शारदा माध्यमिक विद्यालयाच्या इयत्ता नववीतला विद्यार्थी घनश्याम जितेंद्र महाजन हा शाळेत संध्याकाळी साडेचारच्या सुमारास चक्कर येऊन पडल्याने त्याचे निधन झाल्याने परिसरावर शोककळा पसरली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की कळमसरे तालुका अमळनेर येथील शारदा माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थी घनश्याम जितेंद्र महाजन ( वय १५ ) हा इयत्ता नववीतला विद्यार्थी संध्याकाळी शाळेच्या पटांगणात खेळत असताना अचानक चक्कर येऊन पडला. त्यावेळेस शिक्षकांनी त्याला सावरले व स्थानिक डॉक्टरांनी तपासणी करत त्याच्यावर प्रथमोपचार केले व त्वरीत अमळनेर येथे डॉ निखिल बहुगुणे यांच्या दवाखान्यात भरती केले असता त्यांनी तपासून अमळनेर ग्रामीण रुग्णालयात पाठवले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जी एम पाटील यांनी तपासून मृत घोषित केले.
घनश्याम हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. वडील शेतकरी असल्याने तो शाळेबरोबरच त्यांना शेतातही मदत करीत असे. अत्यंत नम्र व हुशार असलेला हा गुणी विद्यार्थी क्रीडा, नाटक सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी सर्व कार्यक्रमात भाग घेणारा व शाळेच्या शिक्षकांचा अत्यंत आवडता असलेला श्यामच्या अचानक जाण्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
श्यामला शिक्षणा बरोबर शेतीची देखील खूप आवड होती, म्हणूनच तो आपल्या वडिलांच्या खांद्याला खांदा लावून कामात नेहमी मदत करीत असत. यामुळे जेष्ठ मंडळी त्याचे नेहमी कौतूक करीत असे.त्याचा या अचानक जाण्याने संपूर्ण गावात स्मशान शांतता पसरली आहे. घनश्याम चा कुटुंबाचा आक्रोश तर मन हेलावणारा होता. घनश्याम ची दुःखद बातमी कळताच संस्थाध्यक्ष, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक गावातील अनेकांनी अमळनेर ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली.
त्याच्या पश्चात आईवडील, आजी आजोबा काका व दोन बहिणी असा परिवार आहे. अमळनेर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन होऊन मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.