माकपकडून सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून आडममास्तरांना उमेदवारी जाहीर

सोलापूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे आणि माकपचे नेते नरसय्या आडम हे एकमेकांचे कट्टर विरोधक मानले जात होते. मात्र, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आडम मास्तरांनी प्रणिती शिंदे यांचा प्रचार केला होता. त्याचा फायदा देखील शिंदे यांना झाला. आता प्रणिती शिंदे लोकसभेवर निवडून गेल्यामुळे त्यांच्या रिक्त असलेल्या विधानसभेच्या जागेवर आडम मास्तरांनी पुन्हा एका तयारी सुरू केली आहे. गुरुवारपासून माकपकडून ‘नोट भी दो, वोट भी दो’ अभियान राबवण्यात येत असून माजी आमदार नरसय्या आडम यांनी निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे.

सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार नरसय्या आडम निवडणूक लढवणार असल्याची घोषणा आता करण्यात आली आहे. सोलापूर शहर मध्य मतदारसंघात प्रणिती शिंदे या मागील तीन टर्म पासून आमदार होत्या. प्रणिती शिंदे आता लोकसभेत निवडून गेल्याने आता सोलापूर मध्य विधानसभा महाविकास आघाडीने माकपला सोडावा, अशी मागणी करण्यात आली आहे. आमचा पक्ष हा गोरगरीब आणि कष्टकऱ्यांचा पक्ष आहे. आता निवडणूक लढण्यासाठी देखील पैसा लागतो. मात्र, आमच्याकडे पैसे नसल्याने जनतेला आम्ही ‘वोट भी दो आणि नोट भी दो’ असे आवाहन करत असल्याचेही माकपच्या वतीने सांगण्यात आले आहे. जनतेकडून लोकवर्गणी घेऊन मी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची घोषणा नरसय्या आडम यांनी केली आहे.

Protected Content