नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | लोकसभा निवडणुकीत 99 जागा जिंकणाऱ्या काँग्रेसने आपलं शतक पूर्ण केलं आहे. इंडिया आघाडीने देशात 233 जागा जिंकल्या असून यामध्ये काँग्रेसच्या 99 जागा होत्या. दरम्यान सांगलीतून अपक्ष लढणारे विशाल पाटील यांनी काँग्रेसला आपले समर्थन जाहीर केले आहे. महाविकास आघाडीत उमेदवारीवरुन वाद झाल्याने विशाल पाटील अपक्ष लढले आणि जिंकून आले. त्यानंतर आज ते दिल्लीत दाखल झाले होते. विशाल पाटील यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्याकडे आपलं समर्थन पत्र सोपवलं आहे. यामुळे आता काँग्रेसचे देशात शतक पूर्ण झालं आहे.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 30 आणि महायुतीला 17 जागांवर विजय मिळाला आहे. काँग्रेसला सर्वाधिक 13 जागा मिळाल्या. उद्धव ठाकरेंच्या पक्षाने 9 तर शरद पवार यांच्या पक्षाने 8 जागांवर विजय मिळवला.विशाल पाटील यांनी काँग्रेसला समर्थन दिल्याने महाराष्ट्रात आता महाविकास आघाडीच्या नावे 31 जागा झाल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर विशाल पाटील काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांच्यासह आज सकाळी दिल्लीला रवाना झाले होते. दिल्लीत विशाल पाटील आणि विश्वजीत कदम यांनी मल्लिकार्जून खरगे यांची भेट घेतली. यावेळी त्यांना काँग्रेसला पाठिंबा असल्याचं पत्र सोपवले. दरम्यान विश्वजित कदम आणि विशाल पाटील मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंचीही भेट घेणार आहेत.
लोकसभा निवडणुकीचे उमेदवार ठरवताना महाविकास आघाडीमध्ये सांगलीमधील जागेवरुन वाद निर्माण झाला होता. उद्धव ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांच्या नावाची परस्पर घोषणा केल्याने काँग्रेसकडून नाराजी जाहीर करण्यात आली होती. यानंतर विश्वजीत कदम यांनीही जाहीरपणे विरोध केला होता. सांगली मतदारसंघाचा निकाल लागताच शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे की, सांगलीबाबत आमची चूक झाली. विशाल पाटील अपक्ष असले तरी आमच्यातीलच आहेत. ते आम्हालाच पाठिंबा देतील.