अमरावतीमध्ये नवनीत राणा यांचा पराभव; काँग्रेसचे बळवंत वानखेडे विजयी

अमरावती-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महाराष्ट्रातील अमरावतीमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. भाजपच्या उमेदवार नवनीत कौर राणा यांचा पराभव झाला आहे. अमरावतीमध्ये भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांची काँग्रेस-महाविकास आघाडीचे नेते बळवंत वानखडे यांच्याशी लढत होती. या निवडणुकीच्या रणात बळवंत वानखडे यांनी नवनीत राणा यांचा पराभव केला. मात्र, या दोघांमधील स्पर्धा खूपच चुरशीची होती. मतमोजणी सुरू झाल्यापासून कधी नवनीत राणा, तर कधी बळवंत वानखेडे आघाडीवर होते. पण, जनतेने शेवटी बळवंत वानखेडे यांचीच निवड केली. अमरावती मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात मतदान झाले.

२६ एप्रिल रोजी झालेल्या मतदानात एकूण ६३.६७ टक्के लोकांनी मतदान केले. अमरावती मतदारसंघातून एकूण ३७ उमेदवार रिंगणात असले, तरी खरी लढत भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये होती. यामध्ये काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला.

२०१९च्या निवडणुकीत नवनीत राणा यांनी शिवसेनेचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांचा पराभव करून विजय मिळवला होता. त्यानंतर त्यांनी नरेंद्र मोदी सरकारला पाठिंबा दिला. २०१४मध्ये नवनीत राणा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली होती, ज्यात त्यांचा पराभव झाला होता. अमरावती लोकसभेची जागा अनेकवेळा शिवसेनेकडे गेली आहे. मात्र, येथून भाजपला कधीही विजय मिळाला नाही. नवनीत यांनीही अपक्ष म्हणून विजय मिळवला होता. मात्र, यावेळी त्या भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. मात्र, यावेळीही अमरावतीतून भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

Protected Content