भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील संतोष बारसे आणि सुनील राखुंडे यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या करणार्या संशयितांपैकी एकाला साक्री पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून गजाआड केले आहे.
या संदर्भातील माहिती अशी की, काल रात्री साडेनऊच्या सुमारास शहरातील जुना सातारा भागातल्या मरीमाता मंदिराच्या समोर कारमधून प्रवास करणार्या संतोष बारसे आणि सुनील राखुंडे यांच्यावर हल्लेखोरांनी बेछुट गोळीबार करून त्यांचा जीव घेतला होता. या प्रकरणी काल रात्री उशीरा शहर पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला होता. यात अकरा जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला होता. यात राजू भागवत सुर्यवंशी यांच्यासह काही जणांचा समावेश होता.
दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर राजू सुर्यवंशी आणि त्यांचे सहकारी शहरात आढळून न आल्याने पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला होता. ते आज साक्री पोलीस स्थानकाच्या अंतर्गत असलेल्या दहिवेल गावातील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या अनुषंगाने पोलीस निरिक्षक हर्षवर्धन गवळी आणि त्यांच्या सहकार्यांचे पथक तयार करण्यात आले.
या पथकाने, सदर हॉटेलमध्ये जाऊन झाडाझडती घेतली असता संशयित तेथून पळून गेले. मात्र त्यांचा पाठलाग करून त्यांना अटक करण्यात आली. यामध्ये दुहेरी हत्याकांडातील संशयित राजू भागवत सुर्यवंशी ( वय ५५, रा. संभाजी नगर, वरणगाव रोड, भुसावळ ) यांचा समावेश होता. त्यांच्या सोबत आनंदा भागवत सुर्यवंशी ( वय ४०, रा. संभाजी नगर, वरणगाव रोड, भुसावळ ); इम्रान शेख गुलाम रसूल (रा. सरस्वती नगर, भुसावळ ); विकास पांडुरंग लोहार (रा. साकेगाव, ता. भुसावळ ); धरमसिंग राससिंग पंडित (वय २९, रा. राहूल नगर, भुसावळ ) हे देखील असल्याने त्यांची चौकशी करण्यात आली.
दरम्यान, दुहेरी हत्याकांडातील संशयित आरोपी राजू भागवत सुर्यवंशी यांना जळगाव एलसीबीचे निरिक्षक किसनराव नजन पाटील यांना संपर्क करून त्यांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी साजन सोनवणे, पोलीस निरिक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली आहे.