मालेगाव येथे २२ घरांना आग

मालेगाव-वृत्तसेवा |  येथील आयशानगर भागातील नुरी हॉल परिसरातील झोपडपट्टीतील फळ्यांच्या घरांना शनिवारी (ता. २३) दुपारी दोनच्या सुमारास अचानक आग लागली. आगीत २२ घरे पूर्णपणे जळून खाक झाली.

पत्रे, पटरी, दांडापटाईत व फळ्या यांची १५ घरे दोन मजली तर ७ घरे एक मजली होती. कष्टकऱ्यांच्या घरातील संसारोपयोगी साहित्याची राख रांगोळी झाली. सुदैवाने आगीत कोणालाही इजा पोहोचली नाही.

महापालिकेच्या अग्निशामन दलाच्या आठ बंबांनी २० फेऱ्या करत आग आटोक्यात आणली. सायंकाळी उशिरापर्यंत पंचनामा नोंदण्याचे काम सुरु होते. आगीचे निश्‍चित कारण समजू शकले नाही. आयशानगर भागातील नुरी हॉलजवळ दाट लोकवस्ती आहे. या ठिकाणी पत्रे, बल्ल्या व फळ्यांची घरे मजुरांनी बांधली आहेत. दुपारी दोनच्या सुमारास गल्ली नं. १ मधील घराला अचानक आग लागली. फळ्यांची घरे असल्याने आगीने क्षणार्धात रौद्र रुप धारण केले.

गल्लीतील इतर घरे आगीने कवेत घेतली. गल्ली नं. २ व ३ मधील घरेही आगीच्या विळख्यात आली. आगीचे लोळ हवेत पसरताच परिसरातील नागरिक जीव घेत घराबाहेर पडले. दुपारची वेळ असल्याने सामाजिक कायर्कर्ते मोठ्या प्रमाणावर मदतीला धावून आले. अग्निशामक दलाच्या तीनही फायर स्टेशनमधून आठ वाहने अवघ्या काही मिनिटात घटनास्थळी पोहोचली. अग्निशमन बंबांनी एकाच वेळी चारही बाजूने आग विझविण्यास सुरवात केली. विभागाचे अग्निशमन अधीक्षक प्रमुख संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आठ बंबांनी २० फेऱ्या करत दोन तासात आग पूर्णपणे आटोक्यात आणली.

झोपडपट्टीतील मोहम्मद हनिफ मोहम्मद सिद्दीक, जुबैदा बानो जुल्पेकार अहमद, मोहम्मद फरीद मोहम्मद समद, शेख मेहबुब शेख ख्वाजा, शेख अहमद शेख जाफर, शेख जाफर शेख अब्दुल सत्तार, शेख अहमद शेख ख्वाजा, शकील अहमद अब्दुल सत्तार, इस्माईल खान लालखान, युसूफखान अशरफ खान, शाहीद खान युसूफखान, रिजवान अहमद शमसुदोहा, समसुदोहा अब्दुल सत्तार, फईम अहमद नजीर अहमद, वारिस अली बाबू अली, शाहीद अली बाबूअली, हारून शेख याकूब यांची दोन मजली घरे आगीत जळाली.

मोहम्मद तैय्यब अली अन्सारी, जमील अहमद मोहम्मद बशीर, अबरार अहमद मेहबूब अन्सारी, गफूर खान रुस्तुम खान, मोहम्मद इब्राहिम अब्दुल कय्यूम, शोएब अली रियाकत अली, मंजुर अहमद खलील अहमद, कलीमुन निस्सा फैजल बेग यांचे एक मजली घर आगीत भस्मसात झाले.

Protected Content