अकोला जिल्हयात कापसांचे बोगस बियाणांची पाकिटे जप्त; कृषी विभागची कारवाई

अकोला-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | कापसाचे बियाणे बाजारात मिळत नसल्याने शेतकरी चांगलाच आक्रमक होत आहे. एकीकडे कापसाच्या बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे हाल सुरू आहेत. तर दुसरीकडे अकोल्यात बोगस बी-बियाणांचा काळाबाजार सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. अकोट तालुक्यातील उमरा शेतशिवारातील एका घरातून कापसाचे बोगस बी-बियाणे जप्त केले. या कारवाईत ७२ हजार रुपयांचे ४७ बोगस बियाणांचे पाकीट कृषी विभागाच्या वतीने जप्त करण्यात आले. ही कारवाई कृषी विकास अधिकारी मिलिंद जंजाळ यांच्या पथक आणि स्थानिक कृषी विभागानं केली आहे.

कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अकोट तालुक्यातील उमरा गावात निर्मल दिलीपसिंग तोमर (ठाकूर) यांच्या शेतातल्या मोडकळीस आलेल्या एका घरात, बोगस बियाणे साठवून ठेवले असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर भरारी पथकानं पोलिसांसह या ठिकाणी मोठी कारवाई केली. या कारवाईत बोगस कापूस बियाणांचे एकत्रित ४७ पाकिटे जप्त करण्यात आले. ज्याची किंमत अंदाजे ७५ हजार २०० रुपये एवढी आहे. निर्मल तोमर यांच्याविरोधात बियाणे कायदा अंतर्गत अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बियाणे मिळत नसल्यामुळे अकोल्यात शेतकरी चांगलाच आक्रमक झालेला आहे. वैतागून शेतकऱ्यांनी रास्ता रोका आंदोलन केले होते. अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची समजूत काढली त्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले होते. जिल्ह्यात बियाण्यांचा प्रचंड तुटवडा निर्माण करण्यात आला असून काळ्या बाजारात दुप्पट दराने बियाणे मिळत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून झाला होता. दुसरीकडे अकोल्यात एका कृषी सेवा केंद्रावर हेच बियाणे जादा दराने विक्री झाल्याचा प्रकार समोर आला होता.

१४०० रुपये प्रति पॅकेट विक्री होत असल्याचं कृषी विभागाच्या भरारी बदकाच्या कारवाईत निर्दशनास आले होते. दरम्यान, सद्यस्थित बी-बियाणांसाठी शेतकऱ्यांना सकाळपासून कृषी केंद्रावर रांगेत बसावे लागत आहे. कूपन मिळाल्यानंतर दुपारी भर उन्हात शेतकऱ्यांना रांगेत उभे रहावे लागते. मात्र, त्यानंतरही पुरेसे बियाणे मिळत नाही, केवळ दोन किंवा तीन बियाण्यांचे पॅकेट हातात मिळतात, असा आरोप शेतकऱ्यांनी केला होता.

Protected Content