अमळनेर लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अल्पवयीन मुलीला घरात एकटी पाहून तिच्यावर अतिप्रसंग करणाऱ्या चोपडा तालुक्यातील गोरगावले येथील आरोपीस अमळनेर जिल्हा सत्र न्यायालयाने पंधरा वर्षाचा सश्रम कारावास आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,अल्पवयीन मुलीचे आई वडील आणि आजोबा तूर कापण्यासाठी शेतात गेले होते. त्यावेळी अल्पवयीन मुलगी ही घरी एकटी असताना तिच्या अज्ञानपणाचा फायदा घेत असता चोपडा तालुक्यातील गोरगावले खुर्द येथील धीरज रवींद्र फुगारे (वय २०) हा ६ जानेवारी २०२२ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास मुलगी घरात एकटी असल्याची संधी साधत घरात प्रवेश करून तिला तू मला फोन का लावत नाही, म्हणून विचारणा केली. त्यानंतर त्याने मुलीशी अतिप्रसंग केला, त्यात मुलगी जखमी झाली. तसेच तिला मारहाण देखील केली. सायंकाळी मुलीचे आई वडील घरी आले असता मुलीने घडलेला प्रकार सांगितला. मुलीला उपचारासाठी चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दवाखान्यातच पोलिसांना दिलेल्या जबाबावरून आरोपी धीरज फुगारे विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पाटील यांनी केला. हा खटला अमळनेर जिल्हा सत्र न्यायालयात सुरू होता. सरकारी वकील ऍड. शशिकांत पाटील यांनी यात ११ साक्षीदार तपासले. पीडिता, तिची आई, डॉ गुरुप्रसाद, डॉ पंकज पाटील, डॉ पवन पाटील यांची साक्ष ग्राह्य धरून न्या. पी आर चौधरी यांनी आरोपी धीरज फुगारे याला दोषी ठरविले त्यानंतर न्यायालयाने त्याला या गुन्ह्यात १५ वर्षांचा सश्रम कारावास व २५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास २ वर्षे साधी शिक्षा सुनावली आहे. पैरवी अधिकारी म्हणून ए एस आय उदयसिंग साळुंखे, पोलीस आकाश पाटील, नितीन कापडणे, हिरालाल पाटील, राहुल रणधीर यांनी काम पाहिले.