एटीएममधून पैसे काढण्याचा बहाणा करून एटीएमकार्ड बदलवून प्रौढाला ३३ हजाराचा गंडा

जळगाव प्रतिनिधी । भडगाव तालुक्यातील आमडदे येथील प्रौढाला एटीएम मधून पैसे काढून देण्याचा बहाणाकरून एकाने एटीएम कार्ड बदली करून परस्पर ३३ हजार रूपये काढून फसवणूक केल्याचा प्रकार कोर्ट चौकातील एटीएम जवळ उघडकीला आला आहे. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, बन्सी बाबुलाल सनगत (वय-४३) रा. आमडदे ता. भडगाव जि. जळगाव  ह.मु. गंगापूर, औरंगाबाद हे ३१ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता हे त्यांचा मुलाची आरोग्य सेवकाचा परिक्षा देण्यासाठी जळगावात आले होते.  शहरातील कोर्ट चौकातील एचडीएफसी बँकेच्या एटीएम मध्ये जावून त्यांनी पैसे काढण्याचा प्रयत्न केला परंतू काढता आले नाही. त्यावेळी ३० ते ३५ वयोगटातील अनोळखी तरूण मुलगा तेथे आला. मी पैसे काढून देतो असे सांगून बन्सी सनगत यांच्या हातातील एटीएम कार्ड व पिन नंबर विचारून घेतला. अनोळखी तरूणाने  हातचालखीने एटीएम कार्ड बदलून पैसे काढण्याचा प्रयत्न केला, परंतू पैसे आले नाही म्हणून त्यांना बनावट एटीएम कार्ड त्यांना परत केले. व तेथून तरूण निघून गेला. त्यानंतर बन्सी सनगत हे देखील निघून गेले. त्यानंतर ३१ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर दरम्यान अज्ञात तरूणाने बन्सी सनगत यांच्या एटीएम कार्डच्या मदतीने परस्पर ३३ हजार २०० रूपये काढून घेतले. हा प्रकार बन्सी सनगत यांच्या लक्षात आल्याने त्यांनी १ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता जिल्हा पेठ पोलीसात धाव घेतली व अज्ञात तरूणाच्या विरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढीलतपास सपोनि किशोर पवार करीत आहे.

Protected Content