यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील साकळी येथे गाव प्रथेनुसार ९ मे रोजी साजरा होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज जन्मउत्सवादरम्यान शिवचरित्रावर आधारित बॅनर लावण्यासाठी ग्रामपंचायतीची परवानगी नसल्याचे कारण देत पोलीस प्रशासनाने सदरील बॅनर काढायला लावले व उपस्थित शिवप्रेमींना मारहाण केल्याची घटना घडल्याने शिवजयंती मिरवणुकीदरम्यान बराच वेळ गावात तणावाचे वातावरण बनलेले होते. जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती रवींद्र उर्फ छोटू भाऊ पाटील यांनी ठिय्या आंदोलन करीत पोलीस प्रशासनाच्या मनमानी कारभारावर संताप व्यक्त करीत नाराजी व्यक्त केली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, साकळी येथे गाव प्रथेनुसार दरवर्षी अक्षय्यतृतीयेच्या निमित्ताने आदल्या दिवशी शिवजन्मोत्सव साजरा करण्याची जुनी परंपरा आहे. त्यानुसार ९ मे २०२४ रोजी शिवजन्मोत्सवाचा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते . दरम्यान या उत्सवातच्या निमित्ताने छत्रपती शिवरायांचा पराक्रमाचे स्मरण व्हावे या उद्देशाने गावातील महात्मा फुले चौकात व चौधरी वाड्याच्या कोपऱ्यावर शिवचरित्रावर आधारित एका प्रसंगाचे बॅनर शिवप्रेमीं नागरिकांकडून लावलेले होते. सदरचे बॅनर साकळी ग्रामपंचायतीच्या परवानगीने लावलेले नसल्याचे कारण देत पोलीस प्रशासनाने सदर बॅनर काढायला लावले. बॅनर काढल्याने संतप्त झालेल्या शिवप्रेमी व पोलिस यांच्यामध्ये बाचाबाची झाली. त्यावर पोलिस प्रशासनाने शिवप्रेमी नागरिकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी काही शिवप्रेमी तरुणांना ताब्यात घेतले व त्यांना ही मारहाण केली. दरम्यान पोलिसांच्या मनमानी कारभाराविरुद्ध तसेच पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या शिवप्रेमींना तात्काळ सोडावे या मागणीसाठी जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती रवींद्र पाटील यांचे सह अनेक पदाधिकारी व शिवप्रेमी नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या फलकासमोर बसुन ठिय्या आंदोलन करीत पोलिसांच्या वागणुकीबाबत संतप्त भावना व्यक्त केली. या ठिय्या आंदोलनात वेळ दरम्यान काही काळ मिरवणूक थांबवण्यात आली होती. मिरवणुकीदरम्यान काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झालेले होते. गावातील प्रतिष्ठीत मंडळीच्या मध्यस्थीने वातावरण शांत झाल्यावर मिरवणुकीला नियोजित मार्गाने सुरुवात झाली.मिरवणुकीत शिवप्रेमींचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून येत होता. मिरवणूक उत्साहात व शांततेत पार पडली.
साकळी येथे विनापरवागनी शिवजन्मोत्सवाचे बॅनर लावल्यामुळे पोलिसांनी केली शिवप्रेमींना मारहाण
7 months ago
No Comments