अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील साने नगर येथे गोठ्यात गुरे बांधण्याच्या कारणावरून तरुणाला चुलत भावासह सख्खा लहान भावाने फायटरने आणि लोखंडी रॉड मारून दुखापत केल्याची धक्कादायक घटना सोमवारी ६ मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता घडली. याप्रकरणी मंगळवार ७ मे रोजी रात्री ९ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, उमेश आबा पाटील वय-३७, रा. साने नगर, अमळनेर हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला असून शेती करून तो आपला उदरनिर्वाह करतो. दरम्यान सोमवारी ६ मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता उमेश पाटील यांचा लहान भाऊ प्रकाश आबा पाटील आणि त्याचा चुलत भाऊ मयूर उर्फ आप्पा विकास पाटील हे दोघे तिथे आले. या ठिकाणी गोठ्यात तुझे म्हशी बांधू नको व शेडचे बांधकाम करू नको असे सांगून प्रकाश आबा पाटील आणि मयूर उर्फ आप्पा विकास पाटील या दोघांनी फायटर आणि लोखंडी रॉड मारून उमेश पाटील याला जखमी केले. दरम्यान याप्रकरणी उमेश पाटील यांनी मंगळवारी ७ मे रोजी रात्री ९ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली. त्यानुसार प्रकाश आबा पाटील आणि मयूर विकास पाटील या दोघांवर अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अशोक साळुंखे हे करीत आहे.