रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | वर्षानुवर्षापासूनची रावेर मतदार संघातील रावेर, निंभोरा, सावदा, बोदवड, मलकापूर येथील प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन प्रवाशी गाड्यांचा थांब्यांचा प्रश्न भावी काळात मार्गी लावणार असल्याचे आश्वासन महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी दिले
रावेर लोकसभा मतदार संघात रावेर तालुका हा केळी उत्पादनात अग्रेसर तालुका आहे. यामुळे केळीच्या व्यापारानिमित्ताने येथे परप्रांतातून येणाऱ्या व्यापाऱ्यांची मोठी संख्या आहे. या भागातील शिक्षणासाठी मुंबई, पुणे, नाशिक येथे जाणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी संख्या आहे. तसेच व्यवसायानिमित्त व खासगी तसेच शासकीय कामानिमित्त दररोज रावेर तालुक्यातून हजारो प्रवाशी पुणे मुंबई येथे जातात. मात्र पुण्याकडे जाणाऱ्या एकाही प्रवाशी गाडीला रावेर रेल्वे स्टेशनवर गेल्या दहा वर्षात थांबा मिळू शकलेला नाही. रावेर येथून दररोज किमान २५ ते ३० खासगी बस चालतात. अव्वाच्या सव्वा भाडे देऊ प्रवाशांचा पैशाचा व वेळेचा अपव्यय होतो. याकडे लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने पहिले नाही.
सुविधांवर खर्च मात्र उपयोग शून्य
खासदार रक्षा खडसे यांनी रावेर लोकसभा मतदार संघातील रावेर, सावदा या स्टेशनवर प्रवाशांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. स्टेशनचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. त्यासाठी करोडो रुपये खर्च करण्यात आले. मात्र मागणी असलेल्या प्रवाशी गाडयांना थांबा नसल्याने याचा फारसा उपयोग नाही. कोरोना काळात येथील महानगरी एक्स्प्रेसचा थांबा रेल्वेने बंद केला आहे. तो पूर्ववत सुरु करण्यासाठी विद्यमान लोकप्रतिनिधींचे प्रयत्न कमी पडले. तर दानापूर-पुणे, गोवा एक्स्प्रेसला थांबा मिळण्याची प्रवाशांची मागणी दहा वर्षातही पूर्ण होऊ शकली नाही. निंभोरा स्टेशनवर दादर-अमृतसर (पूर्वीची पठाणकोट) एक्प्रेसचा स्वातंत्र्यपूर्व काळापासून असलेला थांबा कोरोना काळापासून बंद झाला आहे. या स्टेशनवरून मुंबईकडे जाणारी ही एकमेव गाडी होती.या गाडीचा थांबा नियमित करण्याच्या प्रवाशाच्या मागणीला लोकप्रतिनिधींनी केराची टोपली दाखवली आहे. वर्षानुवर्षांपासून प्रवाशी गाडयांना थांबा मिळण्याची मागणी भावी काळात आपण लक्ष देणार असून हा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे श्रीराम पाटील यांनी सांगितले