सावदा, ता. रावेर-जितेंद्र कुलकर्णी | वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी रावेर लोकसभा मतदारसंघात अभियंता संजय पंडित ब्राह्मणे यांच्या माध्यमातून उच्च शिक्षीत, स्वच्छ प्रतिमा आणि भक्कम आर्थिक पाठबळ असणार्या आंबेडकरी समुदायातील नेत्याला उमेदवारी देऊन तापी खोर्यात अचूक व चतुर चाल खेळल्याचे दिसून येत आहे. यामुळे येथील लढत ही अधिक रंगतदार होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
रावेर लोकसभा मतदारसंघात यंदा तगडी लढत होत असून राज्यातील वलयांकीत मतदारसंघ म्हणून याची ओळख झाली आहे. यात विद्यमान खासदार रक्षाताई खडसे यांच्यावर पक्षाने लागोपाठ तिसर्यांदा विश्वास तर टाकला आहेच, पण त्यांचे सासरे आ. एकनाथराव खडसे यांच्या भाजप वापसीचा मार्ग मोकळा देखील केला आहे. अर्थात, त्यांच्या समोर आव्हाने देखील आहेत. दुसरीकडे हो-नाही करता करता शरद पवार गटाने उद्योजक श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिली असली तरी त्यांना पक्षातून विरोध मोडून काढावा लागणार असल्याचे आजचे चित्र आहे.
या पार्श्वभूमिवर, बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून संजय पंडित ब्राह्मणे यांना उमेदवारी देऊन रावेर मतदारसंघात मोठी खेळी केल्याचे दिसून येत आहे. एक तर ते बी. ई. सिव्हील असून सार्वजनीक बांधकाम खात्यात उच्च पदांवर कार्यरत राहून स्वेच्छानिवृत्ती घेतलेले मान्यवर आहेत. बी. ई. झालेल्या त्यांचा सौभाग्यवती लेवा समाजाच्या असून मूळच्या खिर्डी ता. रावेर येथील रहिवासी आहेत. ब्राह्मणे दाम्पत्य मोठे कंत्राटदार असून अनेक ठिकाणी त्यांचे प्रोजेक्ट सुरू आहेत. स्वच्छ प्रतिमा आणि भक्कम आर्थिक सुस्थितीतल्या संजय ब्राह्मणे यांना रावेरातून उमेदवारी देऊन बाळासाहेबांनी राजकीय चातुर्याचे दर्शन घडविले आहे.
यातील दुसरा आयाम म्हणजे वंचित बहुजन आघाडीच्या पूर्व विभागाच्या जिल्हाध्यक्ष शमीभा पाटील असून त्या पुरोगामी चळवळीतील तेज तर्रार तरूण कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात. मराठा समाजातील शमिभा यांना जिल्हाध्यक्षपद देऊन बाळासाहेब आंबेडकर यांनी आधीच सोशल इंजिनिअरिंगचे गणित साधले आहे. याच्या जोडीला वंचित बहुजन आघाडीचे मतदारसंघातील कॅडर आहेच. यामुळे पक्षाने रावेर लोकसभा मतदारसंघात तगडा दावा दाखल केलेला आहे.
तूर्तास येथून तिरंगी लढत होणार असल्याचे संकेत असले तरी ऐन वेळेस अजून एखादा मातब्बर उमेदवार रिंगणात उतरू शकतो. अशा परिस्थितीत वंचित बहुजन आघाडीचे आव्हान हे अजून मजबूत बनू शकते. अर्थात, याचा परिणाम हा निकालानंतर संपूर्ण स्पष्ट होणारा असला तरी तापी खोर्यात बाळासाहेब आंबेडकर यांनी संजय ब्राह्मणे यांच्या माध्यमातून मातब्बर उमेदवार दिल्याने येथील लढत ही अधिक रंगतदार होणार असल्याचे देखील स्पष्ट झालेले आहे.