चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । शहरातील बसस्थानक नजीकच्या महादेव मंदिर परिसरात लोखंडी तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या संशयित आरोपीला चाळीसगाव शहर पोलिसांनी कारवाई करत ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून लोखंडी तलवार हस्तगत करण्यात आली आहे. याप्रकरणी दुपारी २ वाजता चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, चाळीसगाव शहरातील बसस्थानक जवळील असलेल्या महादेव मंदिर परिसरात संशयित आरोपी निखिल उर्फ बोला सुनील अजबे वय-२२ रा. लक्ष्मी नगर चाळीसगाव हा तरुण हातात लोखंडी तलवार घेऊन परिसरात दहशत माजवीत असल्याची गोपनीय माहिती चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बिरारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी कारवाई करत संशयित आरोपी निखिल अजबे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून लोखंडी तलवार हस्तगत करण्यात आली आहे. याप्रकरणी पो.कॉ. अमोल भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात दुपारी २ वाजता संशयित आरोपी निखिल उर्फ भोला सुनील अजबे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक दीपक पाटील हे करीत आहे.