जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महिलेच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्याने रोख ५० हजार रुपयांसह सोन्याच्या बांगड्या, चांदीच्या मूर्ती, शिक्के असा एकूण ३ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. ही चोरी शनिवार, ३ फेब्रुवारी रोजी बळीराम पेठेतील साईबाबा मंदिरानजीक असलेल्या शिवप्रसाद अपार्टमेंटमध्ये दुपारी ४ वाजेदरम्यान झाली. अज्ञात चोरटा सीसीटीव्हीत कैद झाल्याचे समोर आले आहे.
महाराष्ट्र बँकेमधून निवृत्त झालेल्या चित्रा मोहरील या बळीराम पेठेतील शिवप्रसाद अपार्टमेंटमध्ये दुसऱ्या मजल्यावर राहतात. शनिवार, ३ फेब्रुवारी दुपारी त्यांच्या भावजयीसोबत घराला कुलूप लावून बाहेर गेल्या होत्या. त्यानंतर चोरट्याने कुलूप तोडून घरात प्रवेश केला. महिलेने जमा करून ठेवलेल्या ५० हजार रुपये मूल्याच्या कोऱ्या करकरीत नोटा, सोन्याच्या बांगड्या, चांदीच्या मूर्ती, शिक्के असा एकूण ३ लाखाचा मुद्देमाल चोरून नेला. संध्याकाळी ५ वाजता मोहरील या घरी आल्यावर चोरी झाल्याचे लक्षात आले.
त्यावेळी त्यांनी पहिल्या मजल्यावर राहणारे आशीष जोग यांना या विषयी माहिती दिली. त्यांनी शहर पोलिसांना चोरीसंदर्भात कळवले. उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित, पोलिस निरीक्षक अनिल भवारी, स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि अमोल मोरे, राजेश मेढे, किरण चौधरी, रतन गिते, उमेश भांडारकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या वेळी श्वानपथकाद्वारेही तपासणी करण्यात आली. भर दिवसा एक चोरटा अपार्टमेंटच्या दुसऱ्या मजल्यावर पोहचला व त्याने कुलूप तोडून घरात प्रवेश केला. हा चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला आहे.