पाटणा-वृत्तसेवा | बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा पलटी मारून एनडीए अर्थात पर्यायाने भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून नितीश कुमार आणि लालूप्रसाद यांच्यातील संबंध ताणले गेले होते. या पार्श्वभूमिवर, नितीश हे मोठा निर्णय घेणार असल्याची चर्चा होती. आज सकाळी अगदी तसेच झाले. नितीश कुमार यांनी आज सकाळी जनता दल (संयुक्त) विधिमंडळाच्या बैठकीत राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर केला. या राजीनामा सत्रानंतर भाजपाने आपल्या आमदारांना घेऊन पाठिंब्याचे पत्र दिले. हे पाठिंब्याचे पत्र नितीश कुमारांनी राज्यपालांना सादर केले. यामुळे आता सायंकाळी पाच वाजता नितीश हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे.
गेल्या दहा वर्षात नितीश यांनी भाजप आणि राजद या दोन्ही पक्षांच्या सोबतीने मुख्यमंत्रीपद उपभोगले. यानंतर ते अलीकडेच राजद सोबत सत्तेत होते. तथापि, ऐन विधानसभा निवडणुकीच्या आधी त्यांनी एनडीएच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने देशातील विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.