चाळीसगाव-लाईव्ह ट्रेन्ड्स न्यूज प्रतिनिधी | शहरातील तहसील कार्यालयासमोरून चोरी गेलेल्या दुचाकीची पोलीस स्थानकात नोंद होताच अवघ्या तीन तासात शहर पोलिसांनी सापळा रचून चोरट्याला दुचाकीसह ताब्यात घेतले. याबाबत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
शहरातील लक्ष्मी नगर येथील सागर अजितराव देशमुख (वय-३५) हे वरील ठिकाणी कुटुंबासह राहत असून ते अभियंता पदावर कार्यरत आहे. २० डिसेंबर रोजी ते कामानिमित्ताने तहसील कार्यालयात आपल्या दुचाकीने (क्र. एम.एच. १९ बीए ००६४) आले. पुरी त्यांनी आपली दुचाकी तहसील कार्यालयासमोर उभी केली. मात्र आपले काम आटोपून ते दुपारी दीडच्या सुमारास मूळ जागी आले असता त्यांना उभी केलेली दुचाकी दिसून आली नाही. म्हणून त्यांनी परिसरातसह नातेवाईकांकडे शोधाशोध केली मात्र दुचाकी मिळून न आल्याने त्यांनी २२ डिसेंबर रोजी पोलिसात दुचाकी हरवल्याची फिर्याद दाखल केली.
याबाबत पोलिसात नोंद होताच अवघ्या तीन तासात चोरट्याला दुचाकीसह शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. तत्पूर्वी पोलीस नाईक महेंद्र पाटील व कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर गीते यांना गोपनीय माहिती मिळाली की विना नंबरची मोटरसायकल हिरापूर रोडकडून चाळीसगावकडे येत आहे. त्यावर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी लागलीच एका पथकाची नियुक्ती केली. सदर पथकाने सापळा रचून संशयित आरोपीला दुचाकीसह ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केल्यावर त्यांनी दुचाकी चोरल्याची कबुली दिली. चेतन संतोष पाटील (वय-२८) शिवशक्ती नगर भडगाव रोड, चाळीसगाव असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीताचे नाव आहे.
सदर कारवाई पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक महेंद्र पाटील , कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर गीते, पोलीस हवालदार राहूल सोनवणे, भूषण पाटील, विजय पाटील, समाधान पाटील, मोहन पाटील, आशुतोष सोनवणे, ज्ञानेश्वर पाटोळे, रवींद्र बच्चे व राकेश महाजन आदींनी केली आहे.